

Vijayapura Bus Tipper Collision
विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील लोणी क्रॉसजवळ सरकारी बस आणि टिपर (कँटर) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सुमारे दहा प्रवासी जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टिपरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव टिपर समोरून येणाऱ्या सरकारी बसवर जाऊन आदळला. धडक इतकी भीषण होती की, टिपर चालक अशोक उटगी, त्यांची पत्नी राधाबाई उटगी आणि सरकारी बस चालक हनुमंत चवलादी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात जखमी झालेल्या सुमारे दहा जणांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
अपघातग्रस्त टिपर (नोंदणी क्रमांक केए-28-एए-6792) चडचणकडे जात होता, तर सरकारी बस (नोंदणी क्रमांक केए-28-एफ-2468) चडचणहून विजयपूरकडे येत होती. लोणी क्रॉसजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा दुर्दैवी अपघात घडला.
घटनेची माहिती मिळताच चडचणचे सीपीआय परशुराम मनगूळी, पीएसआय सोमेश गेज्जी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
हा अपघात चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.