

विजयपूर : दिपक शिंत्रे
विजयपूर शहरासह परिसरात बीएसएनएल नेटवर्क समस्येमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर खासदार रमेश जिगजिणगी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती देताना खासदार रमेश जिगजिणगी यांनी सांगितले की, विजयपूर शहरातील बीएसएनएल नेटवर्क समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. कॉलिंग, इंटरनेट सेवा आणि ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठे अडथळे निर्माण होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत.
अनेक ग्राहकांनी ही समस्या थेट माझ्या निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. “आजच्या काळात दूरसंचार सेवा ही प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे.
केवळ संवादासाठीच नव्हे, तर व्यापार, बँकिंग आणि यूपीआय पेमेंटसाठी इंटरनेट अत्यावश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत नेटवर्क नसल्याने नागरिकांना किती मोठा त्रास सहन करावा लागत आहे, याची जाणीव अधिकाऱ्यांना आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
खासदारांनी अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश दिले असून संबंधित तांत्रिक अडचण लवकर दूर करण्यात येईल, अशी हमी अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सततच्या नेटवर्क समस्येमुळे विद्यार्थी, व्यापारी, ऑनलाइन व्यवहार करणारे ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.