बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत जल्लोषी आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यंदा श्रींची विसर्जन मिरवणूक तब्बल ३० तास चालली. गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजता सुरु झालेली विसर्जन मिरवणूक शुक्रवारी (दि.२९) रात्री साडे दहा वाजता महापालिकेच्या गणरायाचे विसर्जन करुन संपली.
हुतात्मा चौक येथे मानाच्या गणपतीची पूजा व आरती झाल्यानंतर गुरुवारी (दि. २८) सायंकाळी साडे चार वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणूक मार्ग सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते व गणेशभक्तांच्या वर्दळीने गजबजला होता. रात्री नऊनंतर मिरवणुक मार्गावर गर्दी वाढली.
तत्पूर्वी दुपारी एक वाजता माळी गल्ली सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमुर्तीचे कपिलेश्वर तलावात सर्वप्रथम विसर्जन करण्यात आले. त्यानंतर विसर्जन स्थळी यंत्रणा सज्ज असूनही श्रीमूर्तींची प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी विसर्जन मिरवणूक सुरु झाल्यानंतर सार्वजनिक मंडळांच्या एकेक श्रीमुर्ती दाखल होवू लागल्या.
मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा गजर आणि डॉल्बीचीही साथ असल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. गणेशभक्तांचा उत्साह आणि संथगतीने सुरु असलेले विसर्जनामुळे सार्वजनिक श्रीमुर्तींना रांगेत थांबावे लागले. शुक्रवारी रात्री साडे दहा वाजता महापालिकेच्या गणरायाला निरोप दिल्यानंतर विसर्जनाची सांगता झाली.
हेही वाचा :