गोवा : अनंत चतुर्दशी व्रताची सांगता; गोव्यातील म्हामाय कामत जोपासताहेत दीडशे वर्षांची परंपरा | पुढारी

गोवा : अनंत चतुर्दशी व्रताची सांगता; गोव्यातील म्हामाय कामत जोपासताहेत दीडशे वर्षांची परंपरा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पणजीतील जुन्या सचिवालयानजीक असलेल्या म्हामाय कामत यांच्या घरची १५० वर्षांची अनंत चतुर्दशीची परंपरा कायम आहे. हे व्रत साजरे करण्यासाठी नातेवाईक मित्रपरिवार मिळून सुमारे ३ हजार भाविक अनंत चतुर्दशीच्या दिवशी गोळा झाले होते. रात्रभर अनंताच्या गजराने म्हामाय कामतीचा वाडा मंत्रमुग्ध झाला होता. शुक्रवारी उत्तर पूजनानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली.

अनंताच्या पूजेचा यंदाचा मान योगेश म्हामाय कामत यांना लाभला. दरवर्षी यजमान पद कुटुंबातील सदस्यांना मिळत असल्याचे कुटुंबातील ज्येष्ठ डॉ. शंकर म्हामाय कामत यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासूनच्या परंपरेप्रमाणे घरातील वडीलधारी मंडळी पूजा करायची पण गेल्या काही वर्षांपासून कुटुंबात पुजनाची वाटणी झाल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीला ज्या पद्धतीने माटोळी सजवली जाते, त्या पद्धतीने माटोळी बांधली जाते. विशेष म्हणजे या माटोळीला सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ लाडू ,पेढे व इतर जिन्नस बांधले जातात. माटोळीच्या साहित्याला शिवण्याचा आणि बांधण्याचा मान ज्याची मुंज झाली आहे. अशाच युवकांचा असतो. महिला या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत. नऊवारी साडी नेसल्याशिवाय महिला या उत्सवात सहभागी होऊ शकत नाही, अशी माहिती ज्येष्ठ सुन नीता यांनी दिली.

वर्ने फातर्फा येथील म्हामाय त्यांच्या घराण्याची कुलदेवता असून कुलदेवता व क्षेत्रीय देवतांना मान ठेवल्यानंतर व त्यांचे नमन केल्यावर अनंत चतुर्थीच्या व्रताला प्रारंभ होतो. गंगापूजन म्हणून घराच्या मधोमध राजांगणात असलेल्या विहिरीचे पुजन केले जाते. त्यानंतर याच पाण्याने महाविष्णूवर अखंड अभिषेक केला जातो.

सकाळी सुरू झालेली पूजा संध्याकाळपर्यंत चालते. त्यानंतर आरत्या व अनंताच्या गजराने वातावरण मंत्रमुग्ध होते. रात्रीच्या वेळी महानैवेद्य वाढला जातो. किमान २१ पक्वान्ने शिजवली जातात. त्यात १४ प्रकारच्या भाज्या असतात. दुसर्‍या दिवशी मंणगणे असते. हाताने थापलेले वडे हे या जेवणाचे आकर्षण असते, अशी माहिती त्यांनी दिली

नातेवाईक आणि कुटुंबातील लोकांपेक्षा मित्रपरिवातील लोक आंगवणी पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. संपत्ती, संतत्ती प्राप्तीसाठी अनेकजण अनंत चतुर्दशीला पूजेसाठी येतात. विधीवत पूजा करण्याचा मान विठ्ठल भटजी यांचा असल्याचे ते म्हणाले.
मुळ पुरुषाकडून गेला होता सापाचा बळी

म्हामाय-कामत घराच्या मुळ पुरुषाकडून सापाचा बळी गेला होता, असे मानले जाते. आगीत साप भस्मसात झाल्यामुळे घराची वंशवेल टिकेना. शेवटी म्हामाय कुलदेवीने अनंत चतुर्दशी व्रत करण्याचे सांगितले. तेव्हापासून वंश फुलला. या घरात तेव्हापासून कधीच काहीच कमी पडले नाही. असे डॉ. शंकर यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button