

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील हिरेकोडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराजाच्या खून प्रकरणातील आरोपीना आज (दि.१७) चिकोडी न्यायालयाने २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे दोन्ही आरोपींना हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. जैन मुनींच्या खून प्रकरणाचे आरोपी नारायण माळी व हसन ढालायत मागील सात दिवसांपासून पोलीस कस्टडीमध्ये होते. आज त्यांची पोलीस कस्टडीची मुदत संपली.
चिकोडी पोलिसांनी आज सायंकाळी ४ च्या दरम्यान दोघांना वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश चिदानंद बडीगेर यांच्यासमोर हजर केले. त्यांना २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीचा आदेश न्यायाधीश बडीगेर यांनी दिला. त्यानंतर दोन्ही आरोपींना कडक बंदोबस्तात बेळगाव- हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले. यावेळी चिकोडी न्यायालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे चिकोडी डीवायएसपी बसवराज यलिगार, सीपीआय आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयाच्या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा