Kamakumar Nandi Maharaj : हिरेकुडी येथे भक्तांच्या अलोट गर्दीत जैनमुनींवर अंत्यसंस्कार | पुढारी

Kamakumar Nandi Maharaj : हिरेकुडी येथे भक्तांच्या अलोट गर्दीत जैनमुनींवर अंत्यसंस्कार

चिकोडी : पुढारी वृत्तसेवा : आचार्य श्री कामकुमार नंदी महाराजांवर  (Kamakumar Nandi Maharaj) आज (दि.९) हिरेकुडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारोंच्या संख्येने भक्त, नेतेमंडळी उपस्थित होते. दुपारी १.३० च्या दरम्यान चिकोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदी पर्वत आश्रमाच्या परिसरात महाराजांवर अंत्यसंस्कार विधी झाला. यावेळी त्यांचे पुतणे व आश्रमाचे अध्यक्ष बाबू भिमाप्पा उगारे यांनी अग्नी दिला. सर्व अंत्यसंस्कार व इतर विधी जैन धर्माच्या विधीनुसार पार पडले.

यावेळी नांदणीचे जीनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी, कोल्हापूरचे श्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी, वरूरचे धर्मसेन भटारक पट्टाचार्य स्वामीजी, आमदार गणेश हुक्केरी, माजी मंत्री व विधान परिषद सदस्य लक्षण सवदी, अरिहंत संघाचे प्रमुख उत्तम पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली यांच्यासह भक्तगन, जैन समाज बांधव आदी उपस्थित (Kamakumar Nandi Maharaj)  होते.

घरची मंडळी उपस्थित :

या अंत्यसंस्काराला मुनींचे मोठे भाऊ लक्ष्मण भिमाप्पा उगारे, पुतण्या बाबू भीमाप्पा उगारे, रामप्पा भिमाप्पा उगारे, सुनील रामप्पा उगारे यांच्यासह इतर घरची मंडळी उपस्थित होती. सकाळी आठ वाजल्यापासून आश्रमावर भक्तांची गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली. अंत्यसंस्कार होईपर्यंत सुमारे 2 हजार भक्तांची गर्दी झाली होती.

भक्तांना अश्रू अनावर :

महाराजांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. यावेळी मोठया प्रमाणात महिला वर्ग उपस्थित होता. यावेळी अनेकांना महाराजांच्या आठवणीने दुःख अनावर झाले. यामुळे अनेक भक्त डोळ्यातून अश्रू काढल्याचे दिसून आले.

Kamakumar Nandi Maharaj : पावसाची सलामी:

पार्थिवावर सर्व विधी होण्यास वेळ लागला. यानंतर पुतणे बाबू उगारे यांनी अग्नी दिल्यानंतर अचानक जोरात पाऊस येऊन पाच मिनिटांत पाऊस थांबला. त्यामुळे पावसाने देखील मुनींना श्रद्धांजली दिली, अशी चर्चा घटनास्थळी सुरू होती.

पोलिसांकडून कडक बंदोबस्त:

अंत्यसंस्कारावेळी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस ठेवण्यात आला होता. यावेळी गदगचे एसपी बी. एस. नेमगौडा यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चिकोडी व हिरेकुडीला पोलिसांचा गराडा :

जैन मुनी बेपत्ता व नंतर खून झाल्याचे कळाल्याने कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होण्याच्या भीतीने चिकोडी व हिरेकुडी गावात शनिवारपासून प्रत्येक गल्लोगल्ली पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आरोपींना कठोर शिक्षा व मुनींना संरक्षण द्यावे:

नांदणीचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामीजी म्हणाले की, जैन धर्म अहिंसा धर्म पाळणारा असून जैन समाजातील एका मुनींची अशी क्रुरपणे हत्या होणे अत्यंत निषेधार्थ आहे. सरकारने मुनींच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा घटना रोखण्यासाठी मुनींना व आश्रमाना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी करत चिकोडीतील सोमवारच्या मूक मोर्चाला सहभागी होण्याचे आवाहन केले.

Kamakumar Nandi Maharaj : सभागृहात आवाज उठविणार : सवदी

यावेळी माजी मंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले की, अशा प्रकारची घटना ही समाजाला काळिमा फासणारी आहे. मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. यासाठी विधान परिषदेच्या सभागृहात आवाज उठविला जाईल. पुन्हा अशी घटना होऊ नये, यासाठी प्रयत्न करू या. यात कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन केले.

कुणावरही द्वेष नसून, कारवाई व्हावी: उत्तम पाटील

नेहमी जगाला मानवता व शांततेचा संदेश जैन धर्माने दिला आहे. पण ही घटना घडणे दुर्दैवी बाब आहे. आपण कोणाशीही द्वेष करत नसून समाजाला न्याय मिळाला हवा, अशी इच्छा व्यक्त केली. पोलिसांनी विषेश म्हणजे एस. पी. संजीव पाटील यांनी सहकार्य केल्याचे सांगून अभिनंदन केले.

सोमवारी सकाळी चिकोडी भव्य मोर्चा :

आचार्य कामकुमार महाराजांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजता शहरातील आर. डी. महाविद्यालयापासून भव्य मूक मोर्चा काढला जाणार आहे. त्यामुळे सर्व जैन बांधव व भक्त उपस्थित राहण्याचे अवाहन यावेळी करण्यात आले.

आरोपी न्यायालयीन कोठडीत :

या प्रकरणातील संशयित आरोपी नारायण माळी व हसन ढालायत यांना न्यायालयाने कोठडी सुनावली. ते सध्या हिंडलगा कारागृहात आहेत. पोलिस त्यांना कस्टडीत घेऊन पुढील तपास सुरू करणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button