बेळगाव : कारदग्याच्या पसारे बंधूंचा आदर्श; सलग १३ वर्षे एकरी शंभर टन ऊस उत्पादन

बेळगाव : कारदग्याच्या पसारे बंधूंचा आदर्श; सलग १३ वर्षे एकरी शंभर टन ऊस उत्पादन

कारदगा : पुढारी वृत्तसेवा; येथील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण पसारे व भाऊसो पसारे यांनी 2009 ते 2022 या काळात सलग 13 वर्षे एकरी 100 टनावर उसाचे उत्पादन घेऊन शेतकर्‍यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. यंदा 2 एकर 18 गुंठे जमिनीत 267 टन उसाचे उत्पादन घेतले असून ऊस उत्पादनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

कारदगासारख्या ग्रामीण भागात पसारे बंधूंनी उच्चांकी उसाचे उत्पादन घेऊन यंदा दत्त कारखान्याला गळीतासाठी ऊस पाठविला आहे. उसाचे विक्रमी पीक घेण्यासाठी पसारे बंधूंनी प्रथम दोनवेळा नांगरणी व रोटर मारून घेतले. त्यानंतर 5 ट्रक शेणखत सोडले. 10 जुलै रोजी साडेचार फूट अंतराच्या सरीमध्ये 86032 जातीचा ऊस दोन फुटावर एक डोळा पध्दतीने लागवड केली.

पीक घेताना डीएपी, पोटॅश, युरिया, ठिबकद्वारे विद्राव्य खताबरोबरच आळवणी डोस वेळोवेळी दिले. त्यामुळे उत्तम दर्जाचे पीक आले असून तोडणीवेळी उसाची लांबी 20 फूट आहे. उसाचे वजन सव्वा चार किलो असून उसाला 50 पेरे आहेत.

पसारे बंधूंनी पीक घेण्यासाठी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शेती अधिकारी हेग्गाण्णा, दिलीप जाधव, प्रभाकर देसाई, उदय खोत, संजय रोंगे, विजय देसाई, दीपक पाटील, पंकज पाटील, जवाहरचे शेती अधिकारी किरण कांबळे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे सांगितले.

शेती हाच मुख्य व्यवसाय : पसारे बंधू

आम्ही घरातील सर्वजण शेतीचे काम करतो. शेती व्यवसाय हा महत्त्वाचा मानतो. आमची 20 एकर शेती असून त्यापैकी 18 एकर उसाचे पीक व 2 एकरात भाजीपाल्याचे पीक घेतो. पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनचा वापर केला आहे. शेतीतील कोणतेही पीक घेताना जिद्द व चिकाटी ठेवली पाहिजे. त्यामुळेच उसाचे विक्रमी उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे लक्ष्मण पसारे व भाऊसाहेब पसारे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news