नाशिक : 'मनरेगा'तून साडेसात हजार मजुरांना मिळतोय हक्काचा रोजगार ; जिल्ह्यात 1700 कामे प्रगतिपथावर | पुढारी

नाशिक : 'मनरेगा'तून साडेसात हजार मजुरांना मिळतोय हक्काचा रोजगार ; जिल्ह्यात 1700 कामे प्रगतिपथावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कोरोनाचे संकट गडद होत असताना, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मजुरांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) आधार बनली आहे. जिल्ह्यातील 15 तालुक्यांत मनरेगा अंतर्गत 1 हजार 673 कामे सुरू आहेत. या कामांच्या माध्यमातून 7 हजार 570 मजुरांना हक्काचा रोजगार मिळाला आहे.

राज्यात कोरोनाचे प्रसार वेगाने होत असून नाशिक जिल्ह्यातही बाधित रुग्णांची संख्या 16 हजारांपार पोहोचली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध पुन्हा एकदा कडक केले आहेत. रुग्णसंख्येचा वेग वाढतच राहिल्यास, प्रसंगी अधिक कठोर निर्णय घेण्याचा इशारादेखील प्रशासनाने दिला आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील जनतेसाठी मनरेगा योजना फायदेशीर ठरत आहे. किमान 100 दिवसांचा रोजगार उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील मजुरांची पावले आता मनरेगाच्या कामांकडे वळत आहेत.

शेतीची कामे थंडावली असताना, द्राक्षबागांचा हंगाम सुरू होण्यासाठी आणखी काही कालावधी शिल्लक आहे. अशा वेळी ग्रामीण मजूर रोजगारासाठी मनरेगाच्या कामांना प्राधान्य देत आहेत. जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत सद्यस्थितीत 1 हजार 673 कामे सुरू आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावरील 1285, तर यंत्रणा स्तरावरील 388 कामांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात या कामांवर एकूण 7 हजार 570 मजुरांनी हजेरी लावली. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास येत्या काळात मनरेगावरील मजुरांच्या संख्येत वाढ होऊ शकते. हीच शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आतापासूनच कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

घरकुलांची कामे वेगाने
मनरेगा अंतर्गत रस्ते, माती नाला बांध, विहीर, वृक्ष लागवड, घरकुल, रोपवाटिका, फळबागा लागवड, पोल्ट्री व अन्य शेड उभारणी अशी विविध प्रकारची कामे हाती घेतली जातात. आजमितीस जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत घरकुलांची सर्वाधिक कामे सुरू आहेत. त्या खालोखाल रोपवाटिका, फळबागा व रस्त्यांची कामे केली जात आहेत.

Back to top button