बेळगाव जिल्ह्यात २.७८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्याची माहिती 

बेळगाव जिल्ह्यात २.७८ लाख हेक्टर पिकांचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्याची माहिती 

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा ;  पावसाअभावी जिल्ह्यातील भीषण दुष्काळी परिस्थितीची शुक्रवारी (दि. ६) रोजी केंद्रीय कृषी व शेतकरी विकास विभागाचे सहसचिव अजितकुमार साहू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाहणी केली. यावेळी जिल्ह्यात पावसाअभावी २.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. प्रत्यक्षात शेती आणि बागायतीसह एकूण पिकांचे नुकसान २ हजार कोटी रुपये आहे. पण एनडीआरएफ मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३३२ कोटी रुपयांचे नुकसान असून यासंदर्भात केंद्र सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

संबधित बातम्या 

जिल्हाधिकाऱ्यांसह पाहणी पथकाने दुष्काळग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली. बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी जवळील नागप्पा हबी यांच्या शेतात सुरुवातीला सोयाबीन पिकाचे, तर राजू होंगळ व बसप्पा कुंतीगेरी यांच्या गाजर पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. याठिकाणी एकरी ५२ हजार तर दोन एकरावर एक लाखांहून अधिक खर्च केला आहे. बियाणे-खतावर एकरी २५ हजार खर्च झाल्याची व्यथा बसप्पा कुंतीगेरी यांनी व्यक्त केली.

नेसरगी परिसरातच २९५ हेक्टर गाजरची पेरणी झाली आहे. पिकाची पूर्ण नासाडी झाल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान पथकाने शेतकऱ्यांशी चर्चा करून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. यानंतर मीराप्पा हुक्केरी यांच्या बारा एकर सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. चचडी येथे वीरभद्रप्पा होसमनी यांच्या दीड एकर सूर्यफूल पिकाचे नुकसान झाले असून २० हजार आधीच खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. पथकाचे प्रमुख अजित कुमार साहू यांनी स्वतः शेतकऱ्यांकडून पीक विमा देयके, बियाणे-खते, शेतमजुरांच्या खर्चाबाबत माहिती घेतली.

जिल्ह्यात पावसाअभावी २.७८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात सर्वसमावेशक माहिती व प्रात्यक्षिक छायाचित्रांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. प्रत्यक्षात शेती आणि बागायतीसह एकूण पिकांचे नुकसान २ हजार ९२८ कोटी रुपये आहे. पण एन.डी.आर.एफ मार्गदर्शक तत्त्वांनुसार ३३२ कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

सोयाबीन, कापूस, सूर्यफूल, गाजर, चवळी, ऊस, टोमॅटो, वाटाणा यासह विविध प्रकारच्या पिकांना फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. साहू यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये तेलबिया विकास संचालनालयाचे संचालक डॉ. के. पोन्नुस्वामी, आर्थिक खर्च विभागाचे सहाय्यक संचालक महेंद्र चंदेलिया, संशोधन अधिकारी शिवचरण आदींचा समावेश होता.

यावेळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. व्ही. जे. पाटील, निवासी जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, प्रांताधिकारी श्रावण नाईक, कृषी सहसंचालक शिवनगौडा पाटील, उपसंचालक डॉ. एच. डी. कोळेकर, पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाचे उपसंचालक डॉ. राजीव कुलेर आदी यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय अभ्यास पथकाने बैलहोंगल तालुक्यातील नेसरगी, कालकुप्पी, सौंदत्ती तालुक्यातील चचडी, हलकी, यरगट्टी तालुक्यातील बुदिगोप्प, यर्गनवी, रामदुर्ग तालुक्यातील चंदरगी, बुदनूर, सलहल्ली व इतर गावांना भेटी देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news