आदितीचा सातासमुद्रापार झेंडा; तिरंदाजीत सांघिक यश | पुढारी

आदितीचा सातासमुद्रापार झेंडा; तिरंदाजीत सांघिक यश

प्रविण राऊत

लिंब :  सातारा तालुक्यातील शेरेवाडी या छोट्याशा गावातील आदिती स्वामीने पुन्हा एकदा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा लौकिक आटकेपार नेला. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 12 व्या दिवशी भारताने तिरंदाजीत महिला कंपाऊंड सांघिकमध्ये सुवर्णवेध साधला. त्यामध्ये आदिती स्वामीचे यश झळाळून निघाले. तिने ज्योती वेण्णम, प्रनित कौर यांच्यासोबतीने चायनिज तैपईच्या महिला संघाला 230-228 असे हरवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आदितीच्या या यशाने सातारा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा दबदबा आणखी वाढला असून आता लक्ष तिच्या वैयक्तिक कामगिरीकडे लागले आहे.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजेतेपद मिळवून आदिती स्वामीने यापूर्वीच जगाच्या नकाशावर नवा इतिहास लिहिला आहे. आदितीच्या कामगिरीमुळे जगभरात भारतासह महाराष्ट्राचे नाव उंचावले असताना आदितीने गुरूवारी आपल्या सुवर्णमय कामगिरीचा सिलसिला कायम राखला. हाँगझोऊ या ठिकाणी सुरू असलेल्या एकोणिसाव्या एशियन गेम्स धनुर्विद्या ( तिरंदाजी ) स्पर्धेमध्ये तिने देशाला सुवर्णपदक मिळवून देण्यात मोठी भूमिका निभावली. आशियाई स्पर्धेत सांघिकमध्ये आदितीच्या सुवर्णमय कामगिरीची मोहीम फत्ते झाली अन् स्वामी कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही.

अदितीचे वडील गोपीचंद स्वामी हे शिक्षक अन् आई शैला स्वामी या ग्रामसेविका आहेत. क्षणाक्षणाला त्यांची उत्कंठा वाढत असतानाच आदितीने विक्रमावर आपली मोहोर उमटवली. हे पाहताना स्वामी दांपत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. या यशानेतर उद्या, शनिवारी (दि. 7) रोजी होणार्‍या आदितीच्या वैयक्तिक कामगिरीकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

आदिती स्वामी ही मूळची शेरेवाडी, ता. सातारची. इयत्ता चौथीपासून तिने तिरंदाजी खेळाकडे आपली पावले वळवली. सध्या ती लाल बहादूर शास्त्री कॉलेजमध्ये सायन्समधून बारावीचे शिक्षण घेत आहे. तर दृष्टी आर्चरी अकादमीत तिने या खेळाचा सराव केला. तिला चित्रकलेची आवड आहे. या वर्षातील जागतिक स्पर्धांसाठी सोनीपत येथे निवड चाचणी घेण्यात आली होती. आदितीने त्यात यश संपादन केले आणि जागतिक स्पर्धांच्या विविध टप्प्यांची पात्रता मिळवली. शिरीष ननावरे व प्रवीण सावंत या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात तिने तिरंदाजीचे कसब आत्मसात केले आहे.

Back to top button