

RRB exams row in Karnataka
मंगळूर : सीईटी (CET) परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना जानवे आणि हातातील रक्षा सूत्र काढायला लावल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कर्नाटकात रेल्वे विभागाच्या एका परीक्षेवरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. २८ ते ३० एप्रिल दरम्यान रेल्वे विभागाच्या नर्सिंग अधीक्षक पदासाठी प्रवेश परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी ॲडमिट कार्ड जारी करण्यात आली आहे. त्यातून उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी मंगळसूत्र (पवित्र सौभाग्य अलंकार) आणि जानवे (पवित्र धागा) सारखी धार्मिक प्रतीके काढून ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावरुन वाद निर्माण झाला आहे.
परीक्षेच्या ॲडमिट कार्डनुसार, उमेदवारांना संगणक-आधारित परीक्षेला बसताना गळ्यातील मंगळसूत्र, इअरिंग्ज, नाकातील नथ, अंगठी, ब्रेसलेट्स आदी दागिने आणि जानवे घालण्यास मनाई करण्यात आली आहे. ही परीक्षा रेल्वे भरती मंडळ (RRB) द्वारे घेतली जात आहे.
परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्याच्या उद्देशाने काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहे. त्यानुसार परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन्स, ब्लूटूथ डिव्हायसेस, कॅमेरा, घड्याळ, बेल्ट, हँडबॅग्ज, पाकीट आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स घेऊन जाण्यास बंदी आहे.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेने (VHP) या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे. रेल्वेच्या नर्सिंग अधीक्षक पदासाठीच्या परीक्षेदरम्यान उमेदवारांना मंगळसूत्र सारखी धार्मिक प्रतीके काढून टाकण्याची सूचना मागे घेण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने (VHP) केली आहे. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मंगळूर येथे होणाऱ्या परीक्षेच्या ॲडमिट कार्डवरील सूचना तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "यामुळे कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतील. अशी हिंदूविरोधी धोरणे सहन केली जाणार नाहीत."
विहिंपचे प्रांत सहकार्यदर्शी शरण पंपवेल यांनी एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, "मी अधिकाऱ्यांना अशाप्रकारचे आदेश रद्द करण्याची मागणी करतो.'' हिंदू उमेदवारांना त्यांच्या धार्मिक भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीने परीक्षा देण्याची परवानगी देण्याची विनंती त्यांनी केली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कर्नाटकातील सीईटी परीक्षेदरम्यान असाच वाद निर्माण झाला होता. त्यावेळी हिंदू विद्यार्थ्यांना पवित्र धागे काढण्यास सांगण्यात आले होते. याबाबत तक्रारी आल्या होत्या.
जानवे आणि मंगळसूत्र ही धार्मिक प्रतीके असून ती आमच्या श्रद्धेच्या भाग आहेत. परीक्षेदरम्यान त्या घालण्यास बंदी घालणे हे धार्मिक अधिकारांचे उल्लंघन असल्याचे हिंदूंचे म्हणणे आहे.