

बंगळूर : राज्यातील वरिष्ठ राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे सांगत श्रीमंत लोकांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने ऐश्वर्या गौडा (वय 36) या तरुणीला अटक केली आहे. गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे आश्वासन देत लोकांची 20 कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचा आरोप ऐश्वर्यावर आहे.
न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस चौकशीसाठी दोन आठवड्यांची कोठडी देण्यात आली आहे. ऐश्वर्या गौडा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि काँग्रेसचे डी. के. सुरेश यांची बहीण असल्याचे भासवायची असा आरोप तिच्यावर आहे.
गेल्यावर्षी बंगळूर पोलिसांनी फसवणुकीच्या चार प्रकरणांमध्ये ऐश्वर्या गौडावर गुन्हा दाखल केला आहे. ऐश्वर्याने ज्वेलरी स्टोअर्स मालक असलेल्या वनिता ऐथल यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवल्याचा आरोप आहे. वनिता ऐथल यांनी गौडावर अधिक परताव्याचे आश्वासन देत आठ कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच प्लास्टिक सर्जरी सेंटर चालवणारे दोन डॉक्टर, एक प्रसिद्ध डॉक्टर आणि एका व्यावसायिक कुटुंबाची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर आहे.
ऐश्वर्या डॉक्टर्स, व्यावसायिक आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी श्रीमंत रियल इस्टेट डीलर असल्याचे सांगायची. त्याचबरोबर तिच्याकडे अंगरक्षक आणि आलिशान गाड्यांचा ताफाही होता.