

बेळगाव: प्रवाशांना जलद सुविधा उपलब्ध करणार्या रॅपिडो कंपनीच्या विरोधात शहरातील रिक्षाचालक एकवटले आहे. यातूनच काही रिक्षाचालकांनी शनिवारी (दि. 26) रात्री क्लब रोड आणि कित्तूर चन्नम्मा परिसरात ‘रॅपिडो’ दुचाकीस्वाराशी वादावादी करुन त्याला घेराव घातला. त्यामुळे, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, एका रिक्षाचालकाने ‘रॅपिडो’ची दुचाकी ऑनलाई बुक केली. त्यानंतर एक दुचाकीस्वार त्याच्याकडे आला. त्यावेळी रिक्षाचालकाने त्याच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. तुम्ही शहरात ही सेवा बजावण्यासाठी रितसर परवानगी घेतली का, असा प्रश्न उपस्थित करुन त्याला धारेवर धरले.
त्यानंतर त्याला काही रिक्षाचालकांनी घेराव घातला. शेवटी त्याला पोलिसांकडे नेण्यात आले. आरटीओ तसेच रहदारी पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत याबाबत वादावादी सुरु होती.
‘रॅपिडो’ कंपनीच्या माध्यमातून प्रवाशांना दुचाकी, ऑटो टॅक्सी आणि मॅक्सी कॅब उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याचा परिणाम स्थानिक रिक्षाचालक तसेच टॅक्सी चालकांवर होत आहे, अशी रिक्षाचालकांची तक्रार आहे. अशा कंपन्यांविरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.