बेळगाव : विजेचा धक्का बसून बांधकाम मजूर ठार, तिघे जखमी

बेळगाव : विजेचा धक्का बसून बांधकाम मजूर ठार, तिघे जखमी

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : इमारतीच्या स्लॅबसाठी सेंट्रिंगचे काम सुरू असताना इमारतीवरून गेलेल्या वीज वाहक तारांचा स्पर्श झाल्याने बेकिनकेरे (ता. बेळगाव) येथील एक सेंट्रिंग कामगार जागीच ठार झाला. तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. कोवाड येथे बुधवारी (दि. १) दुपारी २ वाजता ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोवाड (ता. चंदगड) येथे ताम्रपर्णी नदीच्या पात्राला लागून बाळू घोडगे यांच्या मालकीचे न्यूशांत मटन .या दुकानाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे सेंट्रींग काम करण्यासाठी येथे इमारतीवर ४ जण काम करत होते. दुपारी दोन वाजता स्लॅबसाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या वर उचलून घेत असताना उच्च वीज वाहक तारेला स्पर्श झाला.

यावेळी संदीप मल्लाप्पा हुंदरे (वय २१ , रा. बेकिनकेरे) याला वीजेचा धक्का बसताच इमारतीवरून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तर शेजारी असणारे कृष्णा बाळू भोगण (वय २५, रा. बेकिनकेरे) व नारायण यल्लाप्पा चोपडे (वय २१, रा. बेकिनकेरे) हे वीज धक्क्याने जखमी झाले आहेत. मटन दुकानदाराचा मुलगा दादू हा देखिल विजेचा धक्का बसल्याने जखमी झाला आहे.

मृताचे चंदगड येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची चंदगड पोलिसात नोंद झाली आहे. अधिक तपास सुरू आहे. संदीप हुंदरे याच्या पश्चात आई-वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. तो अविवाहित असून त्याची घरची परिस्थिती बेताचीच आहे. घटनास्थळी बेकिनकेरे येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news