Sextortion : सेक्सटॉर्शन प्रकरणी महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथित पत्रकार गजाआड | पुढारी

Sextortion : सेक्सटॉर्शन प्रकरणी महिलेसह पोलीस कर्मचारी व तथाकथित पत्रकार गजाआड

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : अश्लील व्हिडिओ कॉल करून खंडणी (Sextortion) उकळणाऱ्या एका महिलेसह एका पोलीस कर्मचाऱ्याला तसेच एका तथाकथित पत्रकारालाही गजाआड करण्यात आले. यापूर्वी कसे, किती जणांना यांनी लुबाडले याचा तपास केला जात आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा तालुक्यातील मसावद येथील एका नोकरदाराला 4 एप्रिल 2022 रोजी अनोळखी महिलेने मोबाईलवरून (Sextortion) संपर्क केला. ओळख नसल्यामुळे यांनी प्रतिसाद दिला नाही. परंतु पुढे काही दिवस ती वारंवार फोन करत राहिली.

दोघांमधील संवाद होऊ लागला. अचानक एक दिवस व्हिडिओ कॉलवर बोलत असताना तिने अश्लील चाळे केले. नंतर आपला हा कॉल रेकॉर्ड असल्याचे सांगत तक्रार दाखल करणार असल्याचे सांगायला सुरुवात केली. भलतेच प्रकरण घडत असल्याचे पाहून हा व्यक्ती घाबरलेला असतानाच पोलीस कर्मचारी छोटू शिरसाठ याने संपर्क केला व मध्यस्थी करीत असल्याचा बहाणा करून प्रकरण मिटविण्यास सांगितले. ती महिला आणि पोलीस कर्मचारी शिरसाट यांनी 14 लाख रुपये देशील तरच मिटवू, असे सांगून प्रचंड दबावात घेतले.

घाबरलेल्या या व्यक्तीने अखेरीस नऊ लाख रुपये दिले व ती क्लिप डिलिट करण्यास सांगितले. तथापि हे होत नाहीत तोवरच अतुल थोरात नामक तथाकथित पत्रकाराने देखील अश्लील व्हिडिओ कॉल प्रसारित करण्याची धमकी देत रक्कम मागायला सुरुवात केली. तो व्हिडिओ डिलीट का केला नाही अशी विचारणा पोलीस कर्मचाऱ्याला केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. एकूण सर्व मानसिक छळाला कंटाळून त्या व्यक्तीने जिल्हाा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याकडे धाव घेतली आणि सर्व घटनाक्रम कथन केला.

अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यातून सत्यता हाती येताच अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील यांच्या माध्यमातून गुन्हा दाखल करण्याची कारवाई पूर्ण केली. पोलीस कर्मचारी व तथाकथित पत्रकारासह त्या महिलेला अटक करण्यात आली असून शहादा येथील पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

Back to top button