

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या व्यवस्थापन समितीतील रिक्त होणाऱ्या १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. व्यापारी गटातून सहा जागा बिनविरोध झाल्या असून औद्योगिक गटातील तीन जागांसाठी चौघांचे अर्ज अंतिम राहिले आहेत, तर राखीव प्रवर्गातील उमेदवाराअभावी एक जागा रिक्त राहणार आहे. यासाठी मंगळवारी (दि. 23) मतदान होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. पदाधिकारी निवड २५ रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार आहे.
चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या घटनेच्या नियम २० नुसार एकूण २६ सदस्यांपैकी व्यापारी क्षेत्रातील आजीवन सदस्य गटातून भूपेंद्र पटेल, मनोज मत्तीकोप, प्रशांत कळ्ळीमनी, संजीव कत्तीशेट्टी, स्वप्नील शाह व सामान्य गटातून सुधीर चौगुले यांचा कार्यकाळ संपला आहे. तर औद्योगिक क्षेत्रातून उदय जोशी, दिलीप चांडक, किथ मचाडो यांच्या जागा रिक्त होत आहेत. या जागा व औद्योगिक क्षेत्रातील आधीच रिक्त असलेली एक जागा अशा एकूण १० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
बुधवारी (दि. १७) वैध अर्जाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून व्यापारी गटातून स्वप्नील शाह , मनोजकुमार मत्तीकोप, रमेश लद्दड, प्रशांत कळ्ळीमनी, संजीव कत्तीशेट्टी, सुधीर चौगुले यांची बिनविरोध निवड झाली तर औद्योगिक क्षेत्रातील तीन जागांसाठी बेळगाव विकास पॅनल मधून संदीप बागेवाडी, उदय जोशी, राजेश मुचंडीकर हे तिघेजण रिंगणात आहेत, तर अपक्ष म्हणून अशोक कोळी असे चौघेजण तीन जागांसाठी रिंगणात आहेत.
मंगळवारी (दि. २३) सकाळी ९ ते ५ या वेळेत मतदान होणार आहे. सायंकाळी सहा वाजता उद्यमबागमधील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. व्यापारी क्षेत्रासाठी प्रवीण रांगोळे तर औद्योगिक क्षेत्रासाठी प्रवीण परमशेट्टी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.