

बेळगाव : बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळपासून संततधार पाऊस पडल्याने राकसकोप जलाशय तुडुंब भरले आहे. त्यामुळे दोन दरवाजे अंशतः उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे मार्कंडेय नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गतवर्षी जलाशय 25 जुलै रोजी तुडुंब झाला होता. यंदा गतवर्षीपेक्षा सात दिवस आधी राकसकोप जलाशय भरला आहे. सायंकाळी 7.30 च्या सुमारास जलाशयाचे दोन दरवाजे उघडून पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले. गुरुवारी (18 जुलै) सायंकाळी 7 वाजेपर्यंत राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2,475 फुटांवर पोहोचली. गतवर्षीच्या याच दिवशी जलाशयाची पाणीपातळी 2,453.25 फूट होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 22 फूट पाणीसाठा जादा आहे.
राकसकोप जलाशय परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत 49.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत राकसकोप जलाशयाची पाणीपातळी 2,472.50 फूट होती. ती सायंकाळी 6 वाजता 2,473.10 फूटावर पोहोचली. पावासाचा जोर आणखी वाढल्याने केवळ 24 तासांत चार फूट पाणी वाढले. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास पाणीपातळी 2,475 फुटांवर पोहोचली. त्यानंतर जलाशयाचे दोन दरवाजे पाच इंचाने उघडून पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले. पुन्हा पाणलोट क्षेत्रात वाढ झाली तर रात्री काही दरवाजे उघड्याची शक्यता आहे.
हिडकल जलाशयात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत जलाशयमध्ये 13,829 क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. 426 क्युसेक पाणी विसर्ग होत आहे. आत्तापर्यंत जलाशयात 27.833 टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. या जलाशयाची क्षमता 51 टीएमसी असून अजून निम्याहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे. मलप्रभा नदीवरील नविलुतीर्थ जलाशयात गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 6,247 क्युसेक पाण्याची आवक झाली. 194 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.