भंडारा : पोल्ट्री फार्ममधील दीड हजार कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू

File photo
File photo

भंडारा : पुढारी वृत्‍तसेवा जिल्ह्यात नवतापाचा कहर सुरू असून, तापमान ४२ अंशापुढे गेले आहे. असे असले तरी वीज वितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना कसलीही पूर्व सूचना न देता तब्बल ४ तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याचा फटका पोल्‍ट्री फार्मना बसला आहे. उष्माघाताने तब्‍बल दीड हजार कोंबड्या मृत्यूमुखी पडल्याची घटना लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ येथे उघडकीस आली आहे. या मध्ये पोल्ट्री फार्म चालकाचे लक्षावधी रुपयाचे नुकसान झाले आहे.

पोल्ट्री फार्म संचालक छगन वाघाये यांच्या कुटुंबाकडे संयुक्त अंदाजे ३ हेक्टर शेतजमीन असून ते स्नातक आहेत. नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगारासाठी त्यांनी ६ वर्षापूर्वी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून ५ लाख रुपयाचे अर्थसाहाय्य घेऊन पोल्ट्री फार्मचा व्यवसाय थाटला होता. अल्पावधीतच त्यांनी हा व्यवसाय प्रगतीपथावर नेला. सर्व काही व्यवस्थित सुरू होते. पोल्ट्री फार्ममध्ये बॉयलर प्रताजीच्या कोंबड्याकरिता आवश्यक त्या सर्व सुविधा त्‍यांनी केल्या होत्या.

सध्या नवतपा सुरू आहे. त्‍यातच तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. उन्हामुळे मानवापासून तर प्राणी व पक्षीही त्रस्त आहेत. अशातच वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना कसल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता तब्बल ४ तास वीज पुरवठा बंद केल्यामुळे उष्माघाताने पोल्ट्री फार्म मधील १ हजार ५३१ बॉयलर प्रजातीच्या कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्‍यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीला वीज वितरण कंपनी जबाबदार असल्याने महावितरणने नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. मृत कोंबड्यांना जेसीबीच्या साहाय्याने खड्डा खोदून पुरण्यात आले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news