Karnataka cabinet expansion | सिद्धरामय्या- शिवकुमारांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ मंत्री घेणार शपथ, अशी आहे संभाव्य मंत्र्यांची यादी | पुढारी

Karnataka cabinet expansion | सिद्धरामय्या- शिवकुमारांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ मंत्री घेणार शपथ, अशी आहे संभाव्य मंत्र्यांची यादी

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा; कर्नाटकात सत्ता हाती घेतल्यानंतर (Karnataka government) एका आठवड्यानंतर काँग्रेसने (Congress) शुक्रवारी २४ आमदारांची यादी जाहीर केली जे आज शनिवारी २७ मे रोजी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. कर्नाटक सरकारमध्ये एकूण ३४ मंत्री असण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Chief Minister Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D K Shivakumar) यांच्यासह १० जणांनी २० मे रोजी शपथ घेतली होती.

काँग्रेस मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार शनिवारी निश्चित झाला असून, मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या पसतींच्या १३, तर उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या पसंतीच्या ५ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गटातूनही तिघांना मंत्रिपद मिळणार आहे. अशा तर्‍हेने मंत्रिमंडळातील २४ रिक्त जागा भरण्याचे निश्चित झाले असून, शनिवारी सकाळी ११.३० वाजता शपथविधी होण्याची शक्यता आहे. शनिवारी सायंकाळी सार्‍याच मंत्र्यांना खातेवाटप केले जाईल.

बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, अथणीचे लक्ष्मण सवदी या दोघांचा बेळगाव जिल्ह्यातून समावेश निश्चित मानला जात आहे. त्याचबरोबर धारवाडमधून विनय कुलकर्णी यांच्या नावावरही शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

मंत्रिमंडळ विस्तारासाठी सिद्धरामय्यांनी १९, शिवकुमारांनी १६ आणि खर्गे यांनी ५ आमदारांच्या नावांची शिफारस केली होती; मात्र एकूण २४ जागाच रिक्त असल्याने तिघांच्याही याद्यांमध्ये काटछाट करण्यात आली आहे. सिद्धरामय्यांच्या १३, शिवकुमारांच्या ५ आणि खर्गेंच्या पसंतीच्या ३ आमदारांची निवड मंत्रिपदांसाठी करण्यात आल्याचे समजते.

ज्येष्ठांवर जबाबदारी लोकसभेची

पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी त्या निवडणुकीची तयारी करावी, त्यासाठी त्यांनी पक्ष संघटना वाढवण्याकडे लक्ष द्यावे, असे सुचवण्यात आले आहे.

त्यामुळेच मंत्रिमंडळात बहुतांशी चेहरे युवा आणि पहिल्यांदाच मंत्री बनणारे आहेत. लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातून २८ पैकी २० खासदार निवडून आणण्याचे लक्ष्य काँग्रेसने ठेवले आहे. ते गाठण्यासाठी मंत्रिपद युवा नेत्यांना आणि पक्षाची जबाबदारी ज्येष्ठ नेत्यांकडे असे सूत्र राहुल गांधी यांनी तयार केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे यांचे नाव विस्ताराच्या यादीत नाही.

सिद्धरामय्यांनी घेतली सोनिया, राहुल गांधी यांची भेट

मंत्रिमंडळ विस्तारावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. सिद्धरामय्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर २४ जणांची यादी निश्चित झाल्याचे सांगण्यात येते.

मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्याही समस्या येणार नाहीत, असे मंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी म्हटले होते. त्यानुसार वरिष्ठांशी चर्चा करूनच मंत्र्यांची अंतिम यादी तयार करण्यात येणार आहे.

दोन नावांवरून वाद

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते असलेले बी. के. हरिप्रसाद यांना एकतर विधानसभा अध्यक्ष करा किंवा मंत्रिमंडळात स्थान द्या, असा आग्रह उपमुख्यंत्री शिवकुमार यांनी धरला आहे. तर त्यांच्याऐवजी ज्येष्ठ आमदार नजीर अहमद, प्रकाश राठोड किंवा गोविंदराजू यांना स्थान द्यावे, अशी मागणी सिद्धरामय्यांची आहे. हाच मुद्दा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यातील वादाचे कारण बनला आहे. त्यावर मंत्रिमंडळाची अंतिम यादी निश्चित करण्यापूर्वी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे.

पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल – जारकीहोळी

शनिवारी सकाळी ११.३० वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. २४ नवे मंत्री शपथ घेतील. त्यामुळे ३४ मंत्र्यांचे पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल, असे नवी दिल्लीहून परतलेले काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

संभाव्य मंत्र्यांची यादी

लक्ष्मी हेब्बाळकर
ईश्वर खंड्रे
शिवानंद पाटील
दिनेश गुंडुराव
डॉ. एच. सी. महादेवप्पा
पिरीयापट्टन व्यंकटेश
एस. एस. मल्लिकार्जुन
बैरती सुरेश
कृष्णा बैरेगौडा
रहिम खान
पुट्टरंग शेट्टी
चिंतामणी सुधाकर
एच. के. पाटील
चलुवराय स्वामी
मधुगिरी राजण्णा
संतोष लाड
मधु बंगारप्पा
मांकाळ वैद्य
शिवराज तंगडगी
तिम्मापूर रुद्राप्पा लमाणी
शरणप्रकाश पाटील
भोसराजू नागेंद्र

हे ही वाचा :

Back to top button