कर्नाटक : मंत्रिमंडळ विस्तारात युवकांना संधी; सिद्धरामय्या-शिवकुमारांची दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी खलबते | पुढारी

कर्नाटक : मंत्रिमंडळ विस्तारात युवकांना संधी; सिद्धरामय्या-शिवकुमारांची दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींशी खलबते

नवी दिल्ली, बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : मंत्रिमंडळ विस्तार करताना कोणत्या 20 चेहर्‍यांना संधी द्यावी, यावर आता काँग्रेसमध्ये विचारमंथन सुरू असून, युवा नेत्यांना पसंती दिली जाईल, अशी शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तशी सूचना दिली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत मंत्रिमंडळातील एकूण 24 रिक्त पदांपैकी 20 पदांच्या निवडी निश्चित होतील. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा चालवली आहे.

कर्नाटक मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 34 मंत्री असू शकतात. सध्या दहा मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे. उर्वरित 24 पदांसाठी निवड केली जाणार आहे. त्यासाठी सिद्धरामय्यांनी स्वतःची 19 जणांची यादी बनवली आहे. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी स्वतःची 16 जणांची स्वतंत्र यादी सादर केली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हैदराबाद-कर्नाटक (आंध्र प्रदेशशी संलग्न असलेले कर्नाटकाचे जिल्हे) भागातील पाच जणांना मंत्रिपदाची संधी देण्याची मागणी केली आहे. म्हणजेच प्रत्यक्षात 40 जणांची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत आहेत. पैकी 20 जणांनाच पहिल्या टप्प्यात संधी मिळणार आहे. या 20 मध्ये युवा नेत्यांची संख्या जास्त असावी, असे राहुल गांधी यांचे मत आहे. पहिल्या टप्प्यात 10 ज्येष्ठ नेत्यांना संधी मिळाली, आता दुसर्‍या टप्प्यात प्रादेशिकता आणि जातीबरोबरच युवा चेहर्‍यांना संधी द्या, असे राहुल यांचे म्हणणे आहे.

तथापि, ज्येष्ठ नेते आर. व्ही. देशपांडे, एच. के. पाटील, टी. बी. जयचंद्र यांनीही मंत्रिपदासाठी हट्ट धरला आहे. आगामी लोकसभा निवडणूक लक्षात घेता, ज्येष्ठ नेत्यांना टाळता येणार नाही, असे सिद्धरामय्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गोंधळ वाढला आहे.

सर्वसंमतीसाठी प्रयत्न

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी बुधवारी रात्री तसेच गुरुवारी सकाळी दिल्लीत पक्षाध्यक्ष खर्गे, सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ आणि रणदीपसिंह सूरजेवाला यांच्याशी विस्ताराबाबत चर्चा केली. चर्चेची आणखी एक फेरी होणार असून, त्यानंतर 20 जणांची यादी निश्चित केली जाईल. ती यादी राहुल गांधी तसेच प्रियांका गांधी यांच्याकडे पाठवली जाईल. त्यांची संमती मिळाल्यानंतर नव्या मंत्र्यांची नावे घोषित केली जातील, अशी माहिती दिल्लीतून मिळाली.

मंत्रिमंडळात दोन-तीन जागा रिक्त ठेवा आणि उर्वरित 20 ते 22 जागांसाठी गुरुवारीच नावे निश्चित करा, असा आग्रह सिद्धरामय्यांनी धरला. मात्र गुरुवारी रात्रीपर्यंत नावांबाबत सर्वसंमती झालेली नव्हती. उद्या शुक्रवारी ही यादी निश्चित होण्याची शक्यता आहे.

खातेवाटपातही आग्रह

सध्या 10 मंत्र्यांचा शपथविधी झाला आहे. मात्र खातेवाटप झालेले नाही. विस्तारानंतरच खातेवाटप होणार आहे. त्यातही सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी आपापल्या पसंतीच्या नेत्यांना प्रभावी खाते देण्यासाठी आग्रह धरला आहे. त्यामुळेही पक्षश्रेष्ठींची कोंडी झाली आहे.

यांचेही लॉबिंग

मंत्रिपदासाठी ज्येष्ठ आणि युवा नेतेही लॉबिंग करत आहेत. त्यात एम. एस. वैद्य, ईश्वर खांड्रे, बसनवगौडा तुरविहाळ, बसवराज रायरेड्डी, एस. रवी, रहिम खान, प्रसाद अब्बय्या, गणेश हुक्केरी, यशवंतराय गौडापाटील, एच. के. पाटील, तन्वीर सेठ, एच. सी. महादेवाप्पा, प्रकाश राठोड, लक्ष्मण सवदी यांचा समावेश आहे.

Back to top button