बेळगाव : ‘बालरंगभूमी अभियान’तर्फे १८ फेब्रुवारीला होणार बालनाट्य संमेलन | पुढारी

बेळगाव : 'बालरंगभूमी अभियान'तर्फे १८ फेब्रुवारीला होणार बालनाट्य संमेलन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : मुंबई येथील बालरंगभूमी अभियान या संस्थेतर्फे बेळगाव येथील संत मीरा हायस्कूल येथे पहिल्यांदाच दि. १८ आणि १९ फेब्रुवारीरोजी बालनाट्य संमेलनाचे आयोजन केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची बेळगाव शाखा व बेळगाव येथील फुलोरा या संस्थांच्या सहकार्याने बाल नाट्यसंमेलन होणार आहे. या संमेलनाला चित्रपट अभिनेते सुबोध भावे, अभिनेत्री सई लोकूर, अभिनेते प्रसाद पंडित यांची प्रमुख उपस्थिती आहे. संमेलन अध्यक्षपदी मीना नाईक असतील, अशी माहिती मुंबई येथील बालरंगभूमी अभियान संस्थेच्या अध्यक्षा विना लोकूर यांनी दिली.

नाट्यदिंडीने होणार संमेलनाला प्रारंभ

शनिवारी (दि. १८) दुपारी नाट्यदिंडीने संमेलनाला प्रारंभ होईल. उद्घाटन अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर बेळगाव येथील कलाकारांचा सहभाग असलेली दोन बालनाटके शिबिरार्थी विद्यार्थ्यांसाठी सादर करण्यात येणार आहेत. रविवारी (दि. १९) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत बालरंगभूमी अभियानासाठी काम करणारे मुंबई, पुणे येथील तज्ञ उपस्थित राहून मुलांसाठी अभिनयाची कार्यशाळा घेतील. या संमेलनात बेळगाव शहर परिसरातील २५ ते ३० शाळांमधील प्रत्येकी १५ मुले अशी एकूण ३०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

बालरंगभूमी अभियान ही संस्था मुंबई येथे धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत असून या संस्थेने आतापर्यंत बालरंगभूमीच्या संदर्भात विविध उपक्रम राबवले आहेत. बालनाट्याचे विषय सादरीकरण, इतर तांत्रिक बाबी कशा असाव्यात, याबद्दल संस्था आग्रही असून संस्थेच्या सभासदांनी या संदर्भात वेगवेगळ्या गावात जाऊन मोफत कार्यशाळा घेतल्या आहेत. शासनातर्फे राबविण्यात येणार्‍या बाल राज्य नाट्य स्पर्धेमधील विषय आणि त्याची मांडणी कशी असावी, यासंदर्भातही कार्यशाळा शासनाच्या मदतीने सुरु आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात अन्य ठिकाणी तसेच बेळगाव, कारवारमध्ये अनेक वर्ष ही संस्था सांस्कृतिक नाट्य चळवळीचे कार्य करीत आहे. संमेलन अध्यक्षा मीना नाईक यांना मानाचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्‍या दोन दिवस नाट्यसंमेलनात उपस्थित राहणार आहेत. बेळगावच्या प्रसिध्द अभिनेत्री सई लोकूर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. रविवारी (दि. १९) संमेलनाच्या सांगता कार्यक्रमाला अभिनेते सुबोध भावे यांच्यासह बेळगावचे अभिनेते प्रसाद पंडित उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा 

Back to top button