बेळगाव : मराठा कार्ड भाजपला कितपत लाभदायक ?; कन्नडिगांना विरोध कसा परवडणार? | पुढारी

बेळगाव : मराठा कार्ड भाजपला कितपत लाभदायक ?; कन्नडिगांना विरोध कसा परवडणार?

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महापौर, उपमहानिवडणूक ही महत्त्वाची तजवीज होती. त्यामुळे मराठा, लिंगायत, विणकर आणि ब्राह्मण समाजात समन्वय साधण्याचे आव्हान भाजपसमोर होते. आता महापौर आणि उपमहापौरपद ही दोन्ही पदे मराठा समाजाला दिल्यामुळे हा निर्णय कितपत फायदेशीर ठरणार आणि कन्नड संघटनांचा विरोध कसा परवडणार, असा सवाल उपस्थित होत आहे. तरीही अंतर्गह विरोध शमवण्यासाठी भाजपकडून मराठा कार्ड खेळण्यात आले असून त्याला किती फायदा होणार, हे येणारा काळच ठरवणार आहे.

महापौर निवडणूक जाहीर झाल्यापासून भाजपमधून मराठा, लिंगायत, विणकर आणि ब्राह्मण या समाजातून वरिष्ठांवर दबाव घालण्यात येत होता. यामध्ये प्रामुख्याने सारिका पाटील, शोभा सोमनाचे, वाणी जोशी आणि दीपाली टोपगी यांची नावे चर्चेत होती. महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत विधानसभा निवडणुकांची गणिते दडली आहेत. त्यामुळे वरिष्ठांची भूमिका महत्त्वाची ठरणार होती.

लिंगायत किंवा ब्राह्मण समाजाला महापौरपद देण्यात यावे, यासाठी कन्नड संघटनांनी दबाव घातला होता. पण, भाजपने मराठी व्होटबँक हातातून जाऊ नये आणि भाजपमध्ये मराठा नेत्यांत असलेला असंतोष दूर करण्यासाठी वरिष्ठांनी दोन्ही पदे मराठा समाजाला देऊन एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी, पक्षाला कन्नड संघटनांचा रोष पत्करावा लागणार आहे. त्याचा फायदा कॉंग्रेस कसा उचलणार, हे पाहावे लागणार आहे.

कन्नडिगांचा हिरमोड

भाजपच्या सुकाणू समितीने महापौर आणि उपमहापौरपदासाठी मराठी नगरसेविकांना उमेदवारी दिल्यामुळे कन्नडिगांचा हिरमोड झाला. कन्नड नगरसेविकाला महापौरपद मिळावे, यासाठी वरिष्ठांपर्यंत लॉबिंग करण्यात आले होते. पण, स्थानिक लोकप्रतिनिधीने स्वतःच्या जबाबदारीवर मराठी महापौर केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही कन्नड संघटनांनी निवडीनंतर चन्नम्मा चौकात आंदोलनही केले.

Back to top button