बेळगाव : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी २८ रोजी ‘चलो मुंबई’ ची हाक | पुढारी

बेळगाव : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी २८ रोजी 'चलो मुंबई' ची हाक

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नी जाग आणण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी मुबंई येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्धार मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीत करण्यात आला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले. मराठा मंदिर कार्यालयात बुधवारी (दि. १) मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मध्यवर्ती समिती पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत चलो मुंबई आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

मराठी माणसांचा महामेळावा कर्नाटक सरकारने दडपून टाकला. याविरोधात आम्ही कोल्हापूर येथे आंदोलन केले. त्यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. सीमावासीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एक दिवस महाराष्ट्र बंद करावा, अशी मागणी आम्ही केली होती. पण, महाराष्ट्राने त्याची दखल घेतली नाही. सीमाप्रश्नाच्या खटल्यात कर्नाटक सरकार आक्रमक आहे. वकिलांना रोज ६० लाख देण्याची तरतूद त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारच्या दुर्लक्षामुळे आमच्या वकिलांना चार वर्षांपासून मानधन मिळालेले नाही. अनेकदा आम्ही कर्ज काढून वकिलांना पैसे दिले आहेत. त्यामुळे याबाबत सरकारला ठोस जाब विचारण्यासाठी हा लढा पुकारण्यात आला आहे. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने चलो मुंबई आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले.

प्रकाश मरगाळे यांनी, महाराष्ट्राने सीमाप्रश्नावर आक्रमक होणे आवश्यक आहे. पण, खासदारांच्या बैठकीत सीमाप्रश्नाचा उल्लेखही करण्यात आला नाही. सीमालढ्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला खडसावून जाब विचारण्यासाठी या लढ्याचे आयोजन केले आहे. सरकारला कोंडीत पकडले तरच लढ्याला चालना मिळणार आहे, असे सांगितले.

अध्यक्ष दळवी यांनी सीमाप्रश्नी महाराष्ट्राकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पण, त्या सध्या पूर्ण होताना दिसत त्यामुळे मुंबईत जाऊन नाहीत. सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करुन देणे आवश्यक आहे. यासाठी चलो मुंबई आंदोलनात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

यावेळी अॅड. एम. जी. पाटील, रणजित चव्हाण-पाटील, यशवंत बिर्जे, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, निपाणी विभाग समिती अध्यक्ष जयराम मिरजकर आदींनी मनोगत व्यक्त केले. अॅड. राजाभाऊ पाटील, एस. एल. चौगुले, बी. एस. पाटील, नानू पाटील, बी. ओ. येतोजी, रावजी पाटील, बी. डी. मोहनगेकर, विकास कलघटगी आदी उपस्थित होते.

बैठकीत झालेले निर्णय

२८ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे धरणे आंदोलन
रेल्वेने जाणाऱ्यांनी १० तारखेपर्यंत नाव नोंदणी करावी
खासगी वाहनांनी जाणाऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत नाव नोंदणी करावी
घटक समित्यांकडे नाव नोंदणी करणे आवश्यक
महाराष्ट्र सरकारला जाब विचारणार
पुढील आठवड्यात समिती शिष्टमंडळ मुंबईत पाहणी करणार

Back to top button