बेळगाव : श्री ब्रह्मलिंग मंदिरातील सव्वा किलो चांदीचे दागिने, मूर्ती चोरट्यांकडून लंपास

बेळगाव : श्री ब्रह्मलिंग मंदिरातील सव्वा किलो चांदीचे दागिने, मूर्ती चोरट्यांकडून लंपास

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : बसुर्ते (ता. बेळगाव) येथील श्री ब्रह्मलिंग मंदिरात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्री चांदीचे दागिने, चांदीची मूर्ती व अन्य चांदीच्या वस्तू असे सुमारे सव्वा किलोहुन अधिक चांदीचा ऐवज लंपास केला आहे. तर दानपेटीतील एक वर्षापासूनसाठून राहिलेले सुमारे 50 हजार रुपयांची रक्कमही लंपास करण्यात आली.

गेल्‍यातीन वर्षांपूर्वी जीर्णोद्धार केलेल्या व गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री ब्रह्मलिंग मंदिरात ही चोरी झाली. रविवारी सायंकाळी सात वाजता मंदिर बंद करून पुजारी जोतिबा मुकुंद मेलगे हे घरी गेले. त्यानंतर सोमवारी पहाटे 5.30 वाजता ते मंदिराकडे परतल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार आढळून आला.

ब्रह्मलिंग मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील चांदीचा मुकुट (20 तोळे चांदी), लिंग (10 तोळे चांदी), चांदीचा गुंड (11 तोळे चांदी), गणपतीची मूर्ती (20 तोळे चांदी) व पूजेचा तांब्या ( पाऊण किलो चांदी) यासह दानपेटी फोडून सुमारे 50 हजार रुपयांची रक्कमही लंपास केली आहे.

याबाबत घटनास्थळी काकती पोलिसांनी पाहणी केली असून श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. मात्र मंदिरापासून जवळ असणाऱ्या नाल्यापर्यंत श्वानाने चोरट्यांचा माग दाखवला. ब्रह्मलिंग मंदिर देवस्थानचे अध्यक्ष नेताजी बेनके यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली असून अधिक तपास सुरू आहे.

दोन महिन्यांपूर्वी याच गावात अनुसया डोंगरे यांचे बंद असलेले घर फोडून मध्यरात्री दीड तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहे तर या शेजारी श्रीकांत गायकवाड यांच्या घरी चोरी करत असताना सुगावा लागल्याने चोरटे पळाले होते. या भागात सातत्याने चोऱ्या होत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा…. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news