बेळगाव : पोलिस आक्रमक; तीन गुंडांना अटक; 26 जणांच्या घरांची पहाटे झाडाझडती | पुढारी

बेळगाव : पोलिस आक्रमक; तीन गुंडांना अटक; 26 जणांच्या घरांची पहाटे झाडाझडती

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा: खुनात संशयित असणारा गुंड विशालसिंग चव्हाणला अटक केल्यानंतर शहर पोलिस खाते आता अधिकच आक्रमक बनले आहे. गुंडा यादीत नावे असलेल्या 26 जणांवर बुधवारी सकाळी एकाचवेळी पोलिसांनी छापे टाकले. यापैकी तिघांकडे हत्यारे सापडली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीधर सत्याप्पा तळवार (वय 28, रा. रुक्मिणीनगर), विनय प्रधान (वय 44, रा. महाद्वार रोड) व अल्ताफ सुभेदार (वय 38, रा. खंजर गल्ली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकार्‍यांनी एकाचवेळी ही धडक मोहीम सुरू केली. माळमारुती ठाण्याच्या हद्दीत एकाकडे, तर मार्केट ठाण्याच्या हद्दीत दोघांकडे तलवार, चाकू, मुष्टी, जांबिया यांसह अन्य लहान धारदार शस्त्रे सापडली. ही सर्व हत्यारे जप्त करून त्या-त्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रिअल इस्टेट व्यावसायिक राजू दोड्डबम्मन्नवर याचा खून सुपारी घेऊन झाला. हा खून कुख्यात गुंड व पोलिसांना अनेक प्रकरणांत हवा असलेल्या विशालसिंग चव्हाण याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस  त्याच्या मागावर होते. 21 जून रोजी त्याला वीरभद्रनगर क्रॉसजवळ पळून जाताना गोळी झाडून अटक करण्यात आली. तेव्हापासून पोलिस शहरातील गुंडा यादीतील अन्य गुंडावर नजर ठेवून होते.

आधी ठरल्यानुसार गुंडा यादीत नावे असलेल्या 26 जणांच्या घरात सर्व पोलिस अधिकारी व त्यांचे सहकारी एकाचवेळी घुसले. त्यांनी घराची झाडाझडती घेतली. त्यात तिघांकडे हत्यारे सापडली. भविष्यात त्यांच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये, यासाठी ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

भविष्यात गुंडगिरीने डोके वर काढू नये व गुंडा यादीत असणार्‍यांनी कायदा हातात घेऊन गुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये, यासाठी घर तपासण्याची मोहीम राबवली. भविष्यातही अशी झाडाझडती होईल.
-रवींद्र गडादी, डीसीपी, कायदा व सुव्यवस्था

 

 

Back to top button