हरकती नोंदविण्यास आणखी मुदतवाढ; 3 जुलैपर्यंत राहणार संधी | पुढारी

हरकती नोंदविण्यास आणखी मुदतवाढ; 3 जुलैपर्यंत राहणार संधी

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी आणखी मुदत दोन दिवस वाढविण्यात आली आहे. नवीन आदेशानुसार आता 3 जुलैपर्यंत हरकती व सूचना नोंदविता येणार आहेत. मात्र, अंतिम यादी पूर्वीच्या आदेशानुसार 9 जुलै रोजीच जाहीर होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. या मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी 1 जुलैपर्यंतची मुदत होती, परंतु मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत.

या पार्श्वभूमीवर हरकती नोंदविण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी केली जात होती. शिवाय, हरकती नोंदविण्यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या टू व्होटर अ‍ॅपवरही हरकती व सूचना येत आहेत. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ही मुदत 1 वरून 3 जुलैपर्यंत वाढविली आहे. त्यानुसार मतदार यादीवर हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी मतदारांना अधिक वेळ मिळणार आहे. हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी पूर्वघोषित नियोजनानुसार 9 जुलै रोजीच जाहीर केली जाणार आहे.

Back to top button