

शिक्रापूर : पुढारी वृत्तसेवा : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील राऊतवाडी येथे जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली आहे. स्मशानभूमीसाठी राखीव नसलेल्या या जागेत स्मशानभूमी बांधण्यात आली असून, ही स्मशानभूमी पुनर्वसन खात्याने की ग्रामपंचायतीने बांधली, याचा शोध सुरू झाला आहे.
जमीन गट नंबर 42/50/589 मधील प्लॉट नंबर 119 मधील जमिनीचे क्षेत्र जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे आहे, ते प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आले आहे. याच जमिनीत स्मशानभूमी बांधण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या जमिनीवर स्मशानभूमीचे काम कसे काय केले, कोणी केले तसेच या ठिकाणी शौचालय कोणी बांधले, याबाबतची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश यापूर्वी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्यांना दिले होते. मात्र, ग्रामपंचायत कार्यालयाकडून कोणतीही माहिती अथवा अहवाल प्रांताधिकार्यांना देण्यात आला नाही.
हा प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी याबाबतचे अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश पुन्हा प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकार्यांना दिले. स्मशानभूमी कधी बांधण्यात आलेली आहे, त्यावर कोणत्या फंडातून खर्च करण्यात आला, याबाबत माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे यांनी सांगितले.