बेळगाव : जमीन व्यवहारातून एकावर हल्ला; शहापूर पोलिसांत गुन्हा | पुढारी

बेळगाव : जमीन व्यवहारातून एकावर हल्ला; शहापूर पोलिसांत गुन्हा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : चार एकर शेतजमीन व्यवहारात मध्यस्थी म्हणून गेलेल्या तिर्‍हाईत व्यक्‍तीवर हल्ला केल्याच्या घटनेची नोंद शहापूर पोलिसांत झाली आहे. या प्रकरणी विनायक गंगाधर पाटील (वय 47, रा. लोटस काऊंटी पिनॅकल अपार्टमेंट मंडोळी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

या फिर्यादीनुसार बसाप्पा रूद्राप्पा नायकर (वय 67, रा. शांतीनगर), विष्णूकुमार शंकर कामकर (35, रा. वड्डर छावणी भारतनगर, शहापूर), मंजुनाथ पी. बुलबुले (वय 38, रा. नार्वेकर गल्ली, शहापूर), दीपक छळकी (34, रा. खासबाग) व सुरेश शिगळ्ळी (40, रा. बनशंकरीनगर, खासबाग) यांच्यासह अन्य 50 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयातून आलेल्या आदेशानुसार शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी बसाप्पा यांनी जमीनमालक दत्तात्रय ऊर्फ दत्ता इराप्पा कोकीतकर यांच्याकडून सर्व्हे क्रमांक 566/6 येथील चार एकर शेतजमिनीचे वटमुखत्यारपत्र घेतले. त्यानंतर या व्यवहारात उपरोक्‍त चौघे देखील सामील झाले. या शेतजमिनीत आणखी काही मालक असल्याने हे प्रकरण वादात होते. हा वाद मिटविण्यासाठी फिर्याददार विनायक पाटील यांनी जमीनमालक दत्तात्रय यांना महंमदरफिक एस. खानापुरी (रा. आझमनगर चौथा क्रॉस) याची ओळख करून दिली.

फिर्यादीवर हल्ला

यानंतर झालेल्या या व्यवहारात रक्‍कम न देताच उपनोंदणी कार्यालयात नोंद करण्यात आल्याचा आरोप संशयितांचा आहे. परंतु, यामध्ये विनायक यांना मध्यस्थी असल्याचे सांगत या सर्व संशयितांनी 26 फेब्रुवारी 2022 रोजी शेतजमिनीच्या ठिकाणी बोलावून घेतले. या ठिकाणी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

इतकेच न करता या सर्वांनी 23 मार्च रोजी सकाळी 9 च्या सुमारास पुन्हा उपरोक्‍त संशयित तब्बल 50 लोकांना समवेत घेऊन फिर्याददार राहत असलेल्या लोटस काऊंटी येथे जाऊन फिर्यादीची पत्नी, मुलगा व अपार्टमेंटमधील लोकांसमोर हल्ला केला. तशी याचिका फिर्याददाराने न्यायालयात दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी उपरोक्‍त पाच जणांसह सर्वांवर फसवणूक, खुनी हल्ला यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. न्यायालयामार्फत आलेल्या या प्रकरणाची दखल घेत याचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button