पीएसआय गैरव्यवहार प्रकरण : ठसेतज्ज्ञाने फोडली प्रश्‍नपत्रिका

पीएसआय गैरव्यवहार प्रकरण : ठसेतज्ज्ञाने फोडली प्रश्‍नपत्रिका
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा: पोलिस उपनिरीक्षक ( पीएसआय ) गैरव्यवहार प्रकरणाचा सीआयडीकडून कसून तपास सुरू आहे. या प्रकरणी अटक करण्यात आलेला ठसेतज्ज्ञ विभागातील पोलिस निरीक्षक आनंद मेत्रे याने प्रश्‍नपत्रिका फोडल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात नेमणूक विभागातील बड्या अधिकार्‍यांच्या सहभागाचाही संशय व्यक्‍त करण्यात आला आहे.

परीक्षेत गैरहजर राहिलेल्या उमेदवारांच्या नावाची प्रश्‍नपत्रिका केंद्रातच ठेवण्यात आली होती. शाळा मुख्याध्यापक काशीनाथ यांच्या साहाय्याने त्या प्रश्‍नपत्रिका लांबवण्यात आल्या. त्या प्रश्‍नपत्रिकांना अनुसरून उत्तरे तयार करण्यात आली. त्यासाठी आनंद मेत्रेने प्रश्नपत्रिका संबंधितांपर्यंत पोहोचवल्याचे दिसून आले आहे. हे काम व्यवस्थितपणे पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले होते. स्थानिक पोलिसांना कोणताही सुगावा लागणार नाही किंवा संशय येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली होती. मेत्रे हे मूळचे विजापूर जिल्ह्यातील पडनूर (ता. इंडी) येथील आहेत. 2009 मध्ये ठसे तज्ज्ञ विभागात पोलिस उपनिरीक्षक म्हणून ते रुजू झाले होते.

नियुक्‍तीआधीच पीएसआयचा गणवेश

विवेकनगर ठाण्याचा कॉन्स्टेबल बसनगौडा करेगौडर याचा तात्पुरत्या यादीमध्ये समावेश होता. त्यानंतर त्याच्या गावी आयोजित सत्कार समारंभात त्याने पोलिस उपनिरीक्षकाचा गणवेश घातला होता. हा गणवेश घालून त्याने फोटो शूटही करून घेतले होते. एवढेच नव्हे तर त्याने पीएसआय गणवेशातील फ्लेक्स गावामध्ये लावले होते. याबाबतचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. सेंट्रल केंद्रीय विभागाचे डीसीपी एम. एन. अनुचेत यांनी सदर कॉन्स्टेबलला निलंबित केले.

दिव्या हागरगीकडून काही नावे उघड?

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दिव्या हागरगीने काहीजणांची नावे उघड केल्याची माहिती मिळाली आहे. मुख्याध्यापक काशीनाथ यांचे म्हणणे ऐकून या प्रकरणात सहभागी झाल्याचे तिने बोलून दाखवले आहे. याबाबत पश्‍चात्तापाची वेळ आल्याचे तिने म्हटले आहे. गुलबर्गा येथील एम. एस. इराणी महाविद्यालयात झालेल्या गैरव्यवहारात चंद्रकांत कुलकर्णी, उमेदवार प्रभू, त्याचे वडील शरणप्पा, ज्योती पाटील आदींना सीआयडीकडून अटक करण्यात आली आहे.

पोलिस अधिकारीही सहभागी

पोलिस नेमणूक विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून पीएसआय परीक्षेत गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती सीआयडी अधिकार्‍यांना मिळाली आहे. डीवायएसपी पदावरील अधिकार्‍याचा यामध्ये हात असल्याचा संशय आहे. पण, त्यासंबंधीचे पुरावे मिळालेले नाहीत. पोलिस महासंचालक आणि गृह खात्याला याबाबत कळवण्यात आले आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news