निपाणी : सौंदलगा येथे चारचाकी 300 फूट फरफटत घुसली शेतात | पुढारी

निपाणी : सौंदलगा येथे चारचाकी 300 फूट फरफटत घुसली शेतात

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : वाहनाला रस्‍ता देण्याच्या प्रयत्नात पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या चारचाकीवरील चालकाचा ताबा सुटला. आणि सुसाट असणारी चारचाकी महामार्ग सोडून सुमारे 300 फुटापर्यंत फरफटत शेतात घुसली. यामध्ये सुदैवाने कारमधील बेळगावचे दाम्पत्य एअरबॅगमुळे बचावले. हा अपघात सौंदलगा येथे रविवारी (दि.01 मे) पाचच्या सुमारास झाला.

याबाबत मिळालेल्‍या माहितीनुसार, राकेश कोठारी (वय-38 ) व दिव्या कोठारी (वय-35, रा. दोघेही टिळकवाडी बेळगाव) अशी या अपघातात बचावलेल्या दाम्‍पत्याचे नाव आहे. राकेश आणि दिव्या हे दोघे कोल्हापूर येथे देव दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना त्यांची चारचाकी सौंदलगा बसस्टॅन्डवर आली. यावेळी मागून वेगात येणाऱ्या दुसऱ्या वाहनाने पुढे जाण्यासाठी हॉर्न केला.

यावेळी कोठारी यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने त्यांची चारचाकी महामार्ग सोडून सर्विस रस्त्यावरून फरपटत जाऊन बसस्थानकाशेजारी असलेल्या कृषी संशोधन केंद्रात तारेचे कुंपण तोडून शेतात जाऊन घुसली. यामध्ये गाडीचा मागील टायर फुटला तर या कारमध्ये असलेली एअरबॅग ओपन झाल्याने राकेश आणि दिव्या यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच जवळच असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेऊन चारचाकीमधून दाम्पत्याला बाहेर काढले. आणि त्‍यांची विचारपूस करून पोलिसांना याबाबत माहिती दिली. निपाणी ग्रामीण पोलिसांनी माहितीमिळताच घटनास्थळी ते तात्‍काळ पोहचले. याबाबत कोठारी यांनी निपाणी ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. विशेष म्हणजे मुख्य रस्ता सोडून या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची नागरिकांची वर्दळ कमी असल्याने कोणतीही जीवित व वित्तहानीही झाली नाही. तर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा  

Back to top button