बेळगाव : यंदा शैक्षणिक वर्ष 270 दिवसांचे | पुढारी

बेळगाव : यंदा शैक्षणिक वर्ष 270 दिवसांचे

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक शिक्षण विभागाने 2022-23 या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा शैक्षणिक वर्षात 270 दिवस शैक्षणिक कामासाठी दिले जाणार आहेत. 16 मेपासून शाळा सुरू होणार आहेत. दसर्‍याची सुट्टी 14 दिवसांची जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रात वर्ग घेण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. ऑनलाईनच्या माध्यमातून सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली नाही. दोन वर्षे कशी निघून गेली, हे विद्यार्थ्यांनादेखील कळले नाही. यंदा शैक्षणिक वार्षिक वेळापत्रक शिक्षण खात्याकडून जाहीर झाले असून त्याप्रमाणे शाळा भरवण्यात येणार आहेत. यावर्षी राज्यातील सर्व शासकीय अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांना पूर्णवेळ वर्ग चालविण्याची संधी देण्यात येणार आहे .

270 दिवसांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष असणार असून शैक्षणिक वर्षात एकूण 60 सरकारी सुट्ट्या आणि 270 शालेय दिवस आहेत. त्यात अभ्यासक्रमाबाहेरील उपक्रम, विशेष कौशल्यासाठी 10 दिवस, परीक्षांसाठी 12 दिवस आहेत. त्यामुळे अध्यापनासाठी 228 दिवस मिळणार आहेत. त्यात शिक्षकांनी अभ्यासक्रम पूर्ण करणे आवश्यक आहे. यंदा शालेय पाठ्यपुस्तकात नैतिक शास्त्राचा समावेश असेल.

सर्व धर्मांचा नैतिक अभ्यास शिकवण्यासाठी अभ्यासक्रमांचा समावेश केला जाईल, असे शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी स्पष्ट केले आहे. कोरोनामुळे विस्कळीत झालेली मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांना गायन आणि नृत्याद्वारे हसत-खेळत शिक्षण देण्यावर भर देण्यात येणार आहे.

शैक्षणिक वेळापत्रकावर एक नजर

पहिले सत्र 16 मे 2022 ते 2 ऑक्टोबर 2022
दुसरे सत्र 17 ऑक्टोबर 2022 ते 10 एप्रिल 2023
दसर्‍याची सुट्टी 3 ते 16 ऑक्टोबर
उन्हाळी सुट्टी 11 एप्रिल ते 28 मे 2023 पर्यंत

Back to top button