Bitcoin : एफबीआय अधिकारी कर्नाटकात ; बिटकॉईन घोटाळा | पुढारी

Bitcoin : एफबीआय अधिकारी कर्नाटकात ; बिटकॉईन घोटाळा

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील राजकारणात खळबळ माजवणार्‍या बिटकॉईन घोटाळ्याच्या चौकशीसाठी अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात एफबीआय या मध्यवर्ती तपास संस्थेचे अधिकारी कर्नाटकात आल्याची माहिती मिळाली आहे. पण, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

एकूण 17 देशांत बिटकॉईन घोटाळा विस्तारलेला असून, सुमारे 12 हजार कोटी रुपये त्यात गुंतल्याचा आरोप झाला होता. राज्यातील अनेक नेत्यांनी आपल्या काळ्या पैशाच्या माध्यमातून बिटकॉईन खरेदी केले, असे तपास संस्थांचे म्हणणे आहे. थोडक्यात काळा पैसा पांढरा करण्यासाठी डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक करण्याचा हा प्रकार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिटकॉईन प्रकरणाचा सूत्रधार असणार्‍या श्रीकी ऊर्फ श्रीकृष्ण याचा मागोवा घेत एफबीआयचे पथक कर्नाटकात आले आहे. श्रीकीच्या संपर्कातील व्यक्‍तींची माहिती हे पथक घेत आहे. याविषयी कर्नाटक पोलिसांना कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. आपल्या सूत्रांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न हे पथक करत आहे.

बिटकॉईन प्रकरणात प्रभावी राजकारणी, आयपीएस अधिकार्‍यांचा हात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यातच आता एफबीआयकडून तपास होत असल्याने याची संपूर्ण देशभर चर्चा सुरु झाली आहे. जागतिक पातळीवर गेलेल्या बिटकॉईन घोटाळ्याचे मूळ बंगळूर असल्याचा दावा एफबीआयचा आहे. याबाबतची माहिती एफबीआयने केंद्रीय गृह मंत्रालयाला कळवली होती. केंद्राच्या सूचनेनुसार कर्नाटक पोलिसांनी बिटकॉईन घोटाळ्याचा तपास सुरू केला. त्यानंतर श्रीकीला अटक झाली. श्रीकी हा एक व्यावसायिक हॅकर आहे. त्याच्या चौकशीनंतर बिटकॉईन प्रकरणाची व्याप्‍ती मोठी असल्याचे दिसून आले होते. आता पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे या घोटाळ्यात पैसे गुंतवलेल्या नेत्यांची गाळण उडाल्याची माहिती मिळाली आहे.

गृहमंत्र्यांकडून नकार

गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी एफबीआय अधिकारी बंगळुरात आले नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, चौकशीबाबत केवळ तर्कवितर्क केले जात आहेत. या प्रकरणात सहभागी असणार्‍यांची माहिती चौकशीतून उघड झाली आहे. आणखी तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येईल.

 हेही वाचलत का ?

Back to top button