नागपुरात उष्माघाताचे दोन, तर जळगावात एकाचा बळी | पुढारी

नागपुरात उष्माघाताचे दोन, तर जळगावात एकाचा बळी

नागपूर/ जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सोमवारी उष्माघाताचे तीन बळी गेले आहेत. यामध्ये नागपुरातील दोघांचा आणि जळगाव जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे नागपुरातील पदपथावर राहणार्‍या दोघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.

पहिली घटना सीताबर्डी हद्दीत सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. रिझर्व्ह बँक चौकातील सीजीएस रुग्णालयासमोर ५० वयोगटातील एक इसम बेशुद्धावस्थेत आढळून आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

तसेच येथील मेट्रो पुलाखाली ४० वर्षीय एक इसम बेशुद्धावस्थेत मिळून आला. रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दोघांचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील सुंदरलाल सुकदेव गढरी (४५) या शेतमजुराचा उष्माघाताने मृत्यू झाला. उष्माघाताचा चाळीसगाव तालुक्यातील हा पहिला, तर जळगाव जिल्ह्यातील दुसरा बळी आहे.

गढरी हे सकाळी नेहमीप्रमाणे बकर्‍यांना गवत चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास त्यांना चक्कर आल्याने ते घरी परतले. डॉक्टरांकडे नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Back to top button