बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
ते जिवंत नाहीत.. पण, त्यांचे हृदय धडधडत राहणार आहे… त्याच मृताच्या यकृत, मूत्रपिंडांमुळे कुणाला तरी जगण्याची नवी उमेद मिळत राहणार आहे. ते जगातून निघून गेले तरी अवयवांच्या माध्यमातून ते जिवंतच राहणार आहेत..! होय, ही घटना आहे महाबळेश्वरनगर येथील उमेश दंडगी यांची. त्यांच्या मृत्यूनंतर चौघांना अवयव दान करण्यात आल्यामुळे समाजातील या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
घरात पाय घसरून पडल्यामुळे उमेश बसवाणी दंडगी (वय 51) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. पण, ते जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी होती. त्यातच त्यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला. दंडगी यांना ब्रेनडेड घोषित करण्यात आले होते. त्यामुळे त्यांचे इतर अवयव सुस्थितीत होते. त्यानुसार देहदानाचा निर्णय घेतला.
दंडगी यांचे हृदय डॉ. कोरे रूग्णालयातील एका रूग्णात प्रत्यारोपित करण्यात येणार आहे. यकृत बंगळुरातील एका रूग्णाला, एक मूत्रपिंड धारवाड येथील आणि दुसरे मूत्रपिंड हुबळी येथील गरजू रूग्णाला प्रत्यारोपित केले जाणार आहे. हे अवयव त्या रूग्णालयांत नेण्यात आले आहेत. उमेश दंडगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान राहिले आहे. आता त्यांच्या मृत्यूनंतरही अवयव रूपाने त्यांनी मोठे सामाजिक कार्य केले आहे, अशा प्रतिक्रिया समाजातून येत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, भाऊ आहे.
अनेकवेळा एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याचे अवयक सुस्थितीत असतात. योग्य वेळेत त्यांचा वापर इतर गरजूंसाठी करता येऊ शकतो. त्यामुळे याबाबत समाजात जागरूकता येणे आवश्यक आहे. लोकांनी या विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातून करण्यात येत आहे.