खानापूर : पुढारी वृत्तसेवा
बाळंतपण हा कोणत्याही महिलेच्या दृष्टीने दुसरा जन्म समजला जातो. आपल्या पोटच्या गोळ्याचा या जगातील प्रवेश सुखरूप आणि सुरक्षित व्हावा अशी प्रत्येक मातेची इच्छा असते. हीच इच्छा बाळगून खानापूर सरकारी दवाखान्यात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेचा प्रसूतिपूर्वी काही क्षण आधीच मृत्यू झाला. तथापि तातडीने सिझेरियन करून डॉक्टरांनी तिच्या जुळ्या लेकींना जीवदान दिल्याने मृत्यूनंतरही मातेने मातृत्वाचे समर्थपणे रक्षण केल्याची घटना पाहायला मिळाली.
गंगवाळी (ता खानापूर) येथील अश्विनी अरुण शिंदे (28) ही महिला तिसऱ्या बाळंतपणासाठी गुरुवारी दुपारी खानापूर सरकारी दवाखान्यात दाखल झाली होती. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तिला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. पण नॉर्मल प्रसुती होणे अशक्य वाटू लागल्याने डॉक्टरांनी सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर अचानक अश्विनीचा रक्तदाब कमी झाली. सिझेरियनची तयारी करत असतानाच अचानक तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. त्यात तिचा मृत्यू झाला. यावेळी तिच्या पतीला प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगून बाळांचा जीव वाचवण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची संमती विचारली. पत्नीला गमावलेल्या अरुण यांनी क्षणाचाही विलंब न लावता होकार दर्शविला.
सिझेरियन केल्यानंतर जुळ्या गोंडस मुलींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना इनक्यूबेटरमध्ये ठेवण्यासाठी बेळगावला पाठवण्यात आले. दोन्ही मुलींचे वजन प्रत्येकी अडीच किलो असल्याने त्यांची पुरेशी काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या प्रसंगाने मातेच्या मृत्युनंतरही मातेची कूस बाळाचे समर्थपणे रक्षण करू शकते. हे प्रकर्षाने दिसून आले. अश्विनीच्या मृत्युनंतर आईचा चेहराही पाहू न शकलेल्या गोंडस मुलींकडे पाहून दवाखान्याचा स्टाफ आणि जमलेल्या प्रत्येकाला अश्रू अनावर झाल्याचे दिसून आले.
गर्भिनींच्या आरोग्याची पूर्ण काळजी आणि बाळंतपणा वेळी होणारे महिलांचे मृत्यू रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी खबरदारी घेतली जात असतानाही अशा प्रकारची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा :