

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
शिवछत्रपतींच्या गनिमी कावा युद्धतंत्राचा अभ्यास करण्यासाठी बेळगाव येथील 'मराठा' बटालियनमध्ये आलेल्या जापनीज कमांडोंनी शुक्रवारी न्यू पॅलेसला सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी छत्रपती शहाजी महाराज म्युझियम पाहिले व ट्रस्टचे चिफ पेट्रन शाहू महाराज यांच्याशी संवाद साधला.
जपानी सैनिकांच्या भेटीदरम्यान शाहू महाराज यांनी त्यांना न्यू पॅलेसमधील जपानी अधिकार्याचा छोटा पुतळा आवर्जुन दाखवला. त्या पुतळ्यावरील इंग्रजी आणि जापनीज भाषेतील त्या अधिकार्याचे नावही जपानी अधिकार्यांना वाचायला सांगितले. त्या पुतळ्यावर 'अॅडमिरल टो गो कमांडर इन चिफ ऑफ जापनीज कंबाइन्ड फ्लिट' असे लिहिले आहे. हा पुतळा पाहून सैनिकांनी आश्चर्य व्यक्त केले. यावेळी शाहू महाराज म्हणाले, पहिले महायुद्ध सुरू झाल्याने इंग्लंडमध्ये शिकायला असणारे छत्रपती राजाराम महाराज व प्रिन्स शिवाजी यांनी (1914) भारतात परतण्याचा निर्णय घेतला. युरोप खंड युद्धभूमी असल्याने त्यांनी अमेरिकामार्गे जपान आणि तेथून भारत असा बोटीने प्रवास केला. या प्रवासादरम्यान, जपान येथे मुक्कामाला असताना तेथील सैन्य दलाच्या अधिकार्यांनी त्यांना 'अॅडमिरल टो गो' यांचा पुतळा भेट दिला असावा. 1863 ते 1913 अशी सैनिकी कारकिर्द गाजविणारे अॅडमिरल टो गो यांनी 'मार्शल अॅडमिरल' पदापर्यंत जबाबदारी सांभाळली होती. या अधिकार्याचा पुतळा आजही जतन करून ठेवला आहे.