बेळगाव : ‘सातबारा’ मिळणार जमीन नकाशासह | पुढारी

बेळगाव : ‘सातबारा’ मिळणार जमीन नकाशासह

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
यापुढे जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी भूमापन कार्यालयाला शेतकर्‍यांना धावाधाव करावी लागणार नाही. सातबारा उतार्‍यावरच जमिनीचा नकाशा उपलब्ध होणार आहे. याची पूर्वतयारी महसूल आणि भूमापन खात्यांकडून करण्यात येत आहे. महसूल मंत्रालयाच्या वतीने राज्यातील जमीन धारकांना सातबारा उतार्‍यावर जमिनीचा नकाशा देण्याची योजना आखण्यात आली आहे. रामनगर जिल्ह्यातील चिन्नपट्टण तालुक्यात प्रायोगिक तत्वावर योजना सुरू करण्यात आली असून राज्यभरात येत्या दोन वर्षात योजना सुरू करण्याचा उद्देश सरकारचा आहे.

नवीन योजनेनुसार जमिनीसंदर्भातील सर्व माहिती उतार्‍यावर मुद्रित करण्यात येणार आहे. जमिनीचे क्षेत्र, महसूल, कब्जाधारकांचे नाव, वडिलांचे नाव, पत्ता, इतर हक्‍क, जमिनीचा नमुना, पाण्याचा स्रोत याप्रकारे 13 प्रकारची माहिती त्यामध्ये नमूद करण्यात येणार आहे. सध्या महसूल खात्याकडून 16 अ नावाचा फॉर्म तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्हा, तालुका, विभाग, गाव आणि सर्व्हे क्र. उप क्रमांक याचीही नोंद करण्यात येणार आहे.

जमिनीची माहिती उतार्‍यामध्ये नोंद करत असताना चतु:सीमांचीही नोंद होणार आहे. यामध्ये जमिनीवर झालेल्या अतिक्रमणाचीही माहिती मिळणार आहे. क्यूआर आणि बारकोडची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे. जमीन खरेदी विक्रीमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे सरकारने नव्याने जमिनीची माहिती जमा करत उतारा तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. यातून फसवणुकीचे प्रकार कमी होणार असल्याचे मत महसूल अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

असा राहणार नवीन सातबारा

  • जुन्या सातबारा उतार्‍यातील सर्व माहिती
  • जमिनीचा डिजिटल नकाशा
  • क्षेत्रफळ आणि अतिक्रमणाची माहिती
  • क्यूआर आणि बार कोड

बदलण्यात आलेला नकाशा

जमीन मालकांना सुलभपणे जमिनीसंदर्भातील माहिती उपलब्ध व्हावी, या पद्धतीने नवीन उतारा तयार करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षात ही योजना कार्यान्वित करण्यात येईल.
मुनिश मौदगील, आयुक्त, भूमापन विभाग

 

 

Back to top button