बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण जळालेला मृतदेह… चेहराही ओळखून येत नव्हता…. पुराव्यासाठी काही वस्तू सापडेल म्हटले तर जळालेल्या बेल्टचे बक्कल अन् जळालेल्या टॉवेलचे तुकडे… मग खुन्याचा शोध घ्यायचा कसा? परंतु, पोलिसांनी शक्कल लढवली अन् खुनी जाळ्यात सापडला.
गेल्या आठवड्यात बुधवारी 2 मार्च रोजी सकाळी कणबर्गी रोडवरील रेणुकानगर परिसरात खुनाची घटना उघडकीस आली. गवतगंजीत घालून पेटवलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्याचेच मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मग खून कोणी केला, हे कसे समजणार? परंतु, पोलिसांनी प्रयत्न करत अवघ्या 48 तासांत याचा तपास लावला. त्यामुळे माळमारुतीचे निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकार्यांचे पोलिस आयुक्तांनी विशेष अभिनंदन केले आहे.
गुन्हा कितीही चतुराईने केला असला तरी गुन्हेगार काही ना काही पुरावे मागे सोडतोच, या युक्तीप्रमाणे पोलिसांनी या घटनेचा देखील तपास केला. रेणुकानगरमधील सुरभी हॉटेलच्या बाजूने आत जाण्यासाठी एक रस्ता आहे. मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही बसवलेले आहेत. पोलिसांनी त्या दिवशी जे जे या रस्त्याने आत गेले त्यांची माहिती घेतली. सुमारे 10 ते 12 दुचाकी या दिवशी आत गेल्याचे दिसून आले. त्यापैकी टीव्हीएसच्या दुचाकीवरून दोघे गेल्याचे दिसून आले.
परंतु, जेव्हा ही दुचाकी पुन्हा मुख्य रस्त्यावर आली तेव्हा त्यावर एकटाच व्यक्ती दिसला. आपल्या पत्नीला भेटायला आलेला संतोष नारायण परीट ( वय 36, रा. चंदगड) याला आपल्या दुचाकीवर घेऊन संशयित खुनी परशराम आप्पाण्णा कुरबर (रा. कणबर्गी) हा शेतवडीत गेला होता. त्याला भरपूर मद्य पाजून नंतर टॉवेलने गळा आवळून त्याचा खून केला. जाताना संतोष त्याच्या गाडीवर पाठीमागे बसलेला दिसत होता. परंतु, येताना तो एकटाच दिसला. हे सर्व सीसीटीव्हीत येईल, याची कल्पना परशरामला नव्हती अन् तो आपसूकच जाळ्यात अडकला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलला व खुनाची कबुली दिली.
घटनास्थळी मिळालेल्या पुराव्यावरून याचा शोध घेणे फार अवघड होते. परंतु, जेव्हा या प्रकरणाचा वेगळ्या दिशेने तपास सुरू केला तेव्हा काही धागेदोरे हाती आले व खुनी जाळ्यात सापडला
सुनील पाटील (पोलिस निरीक्षक, माळमारुती)