निपाणी : पुढारी वृत्तसेवा; परिसरात रब्बी हंगामातील शाळू पीक सध्या जोमात असून कणसांची दाणे भरणीही चांगल्या पद्धतीने झाली आहे. यावर्षी अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाल्यामुळे निपाणी परिसरात 1500 हेक्टरहून अधिक क्षेत्रात शाळू (ज्वारी ) पीक घेतले जात आहे.
यंदा प्रारंभीपासूनच परिसरात शाळू पिकासाठी पोषक वातावरण होते. चांगला पाऊस झाला. त्यामुळे पीक जोमदार आल्याने शेतकरीवर्गात उत्साहाचे वातावरण आहे. माळमुरमाड शेतातही शाळूचे पीक चांगले आहे. यंदा यशोदा जातीच्या शाळू पीक काढणी अवस्थेत आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांतच कापणी सुरू होणार आहे.
गतवर्षी उशिरा पेरणी केलेले शाळू पीक चांगले आले होते. त्यावेळी उत्पादनात घट झाल्यामुळे ज्वारीचा दर वधारला होता. परिसरात मालदंडी, सुवर्णा, फुले प्रतिकिलो 30 ते 35 रुपये दर झाला होता. पोषक वातावरणामुळे यंदा गतवर्षीपेक्षा अधिक ज्वारी उत्पादन अधिक होण्याचा अंदाज आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी शाळू पीकवाढीच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला आहे.
गतवेळी कडब्याचा दर प्रतिपेंडी 15 रूपये झाला होता. नजीकच्या कागल तालुक्यात ऊस क्षेत्र जादा असल्यामुळे या भागातील मोठ्या प्रमाणात पशुपालक निपाणी परिसरात दरवर्षी ज्वारी व कडबा खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना ज्वारी व कडब्याला चांगला दर मिळतो. यंदाही कडब्याला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचलंत का?
यंदा पीक क्षेत्रात वाढ झाली असून उत्पादनाचीही चांगली अपेक्षा आहे. पीक चांगले साधल्याने शेतकर्यांना चांगल्या दराची अपेक्षा लागून राहिली आहे. चांगल्या हवामानामुळे पिकाबरोबरच जनावरांच्या चार्यासाठी उपयुक्त ठरणार्या कडब्यालाही चांगला दर मिळेल अशी आशा आहे.
– दिनकर पाटील, शेतकरी