निपाणीत पद्मा गादी दुकानाला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान | पुढारी

निपाणीत पद्मा गादी दुकानाला भीषण आग; कोट्यवधीचे नुकसान

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : शहराच्या मुख्य जुन्या पी.बी रोडवर असलेल्या प्रसिद्ध सदानंद दत्तात्रय पाटील यांच्या मालकीच्या पद्मा गादी दुकान वजा कारखान्याला आज (गुरुवार) दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाल्याने सुमारे कोट्यावधीची हानी झाली.

दरम्यान ही घटना लक्षात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी पोलीस व स्थानिक नागरिक, व्यापारी, नगराध्यक्ष, नगरसेवक यांनी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, मात्र ही आग दोन तास धुमसत राहिली. त्यामुळे या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत कोट्यावधीची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, शहरातील जुना पी. बी रोडवर गेल्या अनेक वर्षापासून सदानंद दत्तात्रय पाटील (मळगेकर बंधू ) यांचे प्रसिद्ध पद्मा गादी कारखाना वजा दुकान आहे. दुपारी अचानकपणे आग लागल्याचे लक्षात आली. यानंतर घटनास्थळी नगराध्यक्ष जयवंत भाटले, शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कृष्णवेनी गुर्लहोसुर यांच्यासह अग्निशमन विभागाचे सुमारे 25 ते 30 कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान ही घटना मोठी असल्याने पद्मा गादी दुकाना लागून असलेले महादेव जनरल स्टोअर्स, वैष्णव स्वीट मार्ट या दुकानातील सर्व साहित्य व इतर माल परिसरातील स्थानिक व्यापारी व नागरिकांनी तसेच पोलीस प्रशासन विभागाने बाहेर काढल्याने मोठी हानी टळली. मात्र या आगीत पद्मा गादी दुकानातील संपूर्ण साहित्य रोख रक्कम जळून खाक झाल्याने कोट्यावधी हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन विभागाने व्यक्त केला आहे.

दुपारी 02:30 वाजता लागलेली आग सुमारे दीड तास धुमसत होती. या काळात अग्निशमन विभागास पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यानीही पाण्याच्या टँकरसह धाव घेऊन आगीच्या घटनेवर नियंत्रण आणले.दरम्यान पद्मा गादी दुकान हे मुख्य रोडवर असल्याने नागरिक व्यापारी व विक्रेत्यांची मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उपस्थित जमावावर पोलिसांना पर्यायाने लाठीचार्ज करावा लागला, ही लागलेली आग अलीकडच्या काळातील सर्वात मोठी घटना आहे या आगीत पद्मा गादी दुकानाचे मालक पाटील बंधू यांचे कोट्यवधींची हानी झाली. मात्र तातडीने अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केल्याने पद्मा गादी दुकान वगळता इतर दुकाने आगीच्या घटनेपासून बचावली गेली.

Back to top button