बेळगाव : आता समितीचे नेते टार्गेट, कामात अडथळ्याचा आरोप | पुढारी

बेळगाव : आता समितीचे नेते टार्गेट, कामात अडथळ्याचा आरोप

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा, मराठी युवकांना एकीकडे न्यायालयातून जामीन मिळत असतानाचा आता पोलिसांकडून पुन्हा समिती नेत्यांना टार्गेट करण्यात येत आहे. मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासाठी परवानगी न घेता व्यासपीठ उभारणे आणि महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यात अडथळा आणल्याचे कारण देत गुन्हा दाखल झालेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्‍यांना सोमवारी पोलिस ठाण्यात बोलावून नोटिसा देण्यात आल्या.

कर्नाटकी विधिमंडळ अधिवेशनाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे गेल्या 13 डिसेंबर रोजी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर मराठी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समिती कार्यकर्त्यांनी व्हॅक्सिन डेपो रस्त्यावर व्यासपीठ उभारले होते. पण परवानगी न घेता उभारलेले व्यासपीठ काढा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना त्यांचे कर्तव्य बजावण्यास विरोध केला, असा आरोप ठेवून महापालिकेच्या उपकार्यकारी अभियंता मंजुश्री मंजन्ना यांनी टिळकवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीवरून पोलिसांनी म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. यासंदर्भात अध्यक्ष दीपक दळवी, सरचिटणीस माजी महापौर मालोजी अष्टेकर, कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांना सकाळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात बोलावून नोटिसा दिल्या. पदाधिकार्‍यांप्रमाणे इतरांनाही पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देण्यात येणार असल्याचे समजते. समितीच्या पदाधिकार्‍यांसह 28 जणांवर हे गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button