Balu Dhanorkar : वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन खासदार बाळू धानोरकरांनी घेतला जगाचा निरोप

Balu Dhanorkar : वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन खासदार बाळू धानोरकरांनी घेतला जगाचा निरोप
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: भद्रावती येथील वडील नाराणराव धानोरकर (वय ८०) यांची प्रकृती बिघडली. त्यांना नागपुरातील रूग्णालयात भरती करण्यात आले. त्यातच मुलगा सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही रुग्णालयात भरती करण्यात आले. दोघांवरही उपचार सुरू असताना वडिलांनी २८ मेरोजी रूग्णालयातच अखेरचा श्वास घेतला. निधनाच्या बातमीने खासदार बाळू धानोरकर यांना धक्का बसला. त्यांनी नागपुरातच वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.‍ आणि दोन दिवसांनी ३० मेरोजी पहाटे त्यांनी जगाचा निरोप घेतला. वडील व मुलाचे एकाचवेळी असे निघून जाणे धानोरकर कुटुंबियांना मोठा चटका लावून गेला.

नारायणराव धानोरकर भद्रावतीचे. त्यांना दोन मुले. अनिल धानोरकर मोठा मुलगा ते सध्या भद्रावतीचे नगराध्यक्ष आहेत. तर लहान मुलगा सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) हे चंदपूर- आर्णी- वणी लोकसभेचे खासदार आहेत. बाळू धानोरकर यांना पत्नी प्रतिभा व दोन मुले तर अनिल यांना मुलगा, मुलगी अशी अपत्य आहेत. तर अनिल व बाळू यांना एक बहिण आहे.

बाळू धानोकर यांची राजकारणाची सुरूवात मोठा भाऊ अनिल यांच्या हाताला हात धरून झाली. कालांतराने मोठ्या भावापेक्षाही बाळू धानोरकरांनी राजकरणात गगनभरारी घेतली. भद्रावती येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख ते तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय चढता आलेख सुरू झाला. 2009 मध्ये जिल्हा प्रमुख असताना त्यांनी भद्रावती विधानसभा लढविण्याची तयार केली. निवडणूक लढविली. परंतु संजय देवतळे यांच्या पुढे त्यांचा निभाव लागला नाही. पराभवानंतर त्यांनी पुन्हा जनसंपर्क वाढवित पुढच्या विधानसभेची तयार चालू ठेवली.

२०१४ मध्ये पुन्हा त्याच विधानसभा क्षेत्रातून त्यांना शिवसेनेने उमेदवारी मिळाली. यावेळी मात्र संजय देवतळे यांचा पराभव करून भद्रावती विधानसभेवर भगवा फडकविला. आणि राज्याच्या राजकारणात बाळू धानोरकर यांची एन्ट्री झाली. आमदारकीनंतर खासदारकी मिळावी, अशी इच्छा त्यांच्या मनात होती. त्यादृष्टीने त्यांनी काम सुरू केले. २०१४ मध्ये देशात सत्ता परिवर्तन झाले. २०१९ च्या निवडणुकीतही मोदी यांची हवा होती. यावेळी मात्र, बाळू धानोरकर यांनी लोकसभा ‍ लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु शिवसेनेमध्ये असल्याने ते शक्य नव्हते. त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. २०१९ च्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये एन्ट्री केली.

पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची व्यक्त केली होती इच्छा

यावेळी काँग्रेसमध्ये चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवाराकरीता चांगलीच रस्सीखेच सुरू होती. परंतु आपल्या चाण्यक्य नितीने धानोरकर यांनी लोकसभेची तिकीट मिळविले. संपूर्ण देशात मोदींची लाट असताना महाराष्ट्रातून काँग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर हे चंद्रपूर आर्णी वणी लोकसभा क्षेत्रातून निवडून आले. आणि देशाच्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. लोकसभा क्षेत्रातील प्रश्न असो वा अन्य ठिकाणचे. त्यांनी संसदेच्या पटलावर सडेतोडपणे प्रश्न मांडले. प्रश्न मांडून ते थांबले नाहीत. तर त्यांनी ते सोडविण्याकरीता सतत पाठपुरावा केला. त्यामुळे चंद्रपूरचे बाळू धानोरकर यांचे नाव देशाच्या राजकारणात लवकरच रूजले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते बरेचदा चर्चेत राहिले. निवडणुका जिंकण्याचे तंत्र आपल्याकडे असल्याचे ते सांगत असत. एकदा तर त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात वाराणशीमधून निवडणूक लढविण्याबाबत वक्तव्य केले होते. राजकीय वक्तव्यामुळे राजकारण्यांच्या मनामध्ये ते घर करून राहायचे. धकाधकीच्या राजकीय प्रवासात त्यांचे स्वत:चे आरोग्याकडे दूर्लक्ष झाल्याने त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया पार पडली. येथूनच त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले.

Balu Dhanorkar : खासदार धानोरकर यांचेसाठी मे महिना मोठा धकाधकीचा ठरला

 खासदार धानोरकर यांचेसाठी मे महिना मोठा धकाधकीचा ठरला. याच महिण्यात जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पार पडल्या. भद्रावती, वरोरा, चंद्रपूर व मूल या ठिकाणी त्यांनी लक्षकेंद्रीत करून बाजार समित्या जिंकण्याचा निर्धार केला होता. परंतु काँग्रेसमधील गटातटाच्या राजकारणामुळे त्यांना निवडणुका जिंकता आल्या नाही. काँग्रेसच काँग्रेसच्याविरोधात उभी राहिल्याने त्यांचा हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. बाजार बामित्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी उलट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून धानोरकर यांचा पराभव केल्याचा विजयोत्सवही साजरा केला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला. दुसरीकडे पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ प्रवीण काकडे यांना यवतमाळ जिल्ह्यातील बँक प्रकरणात ईडीने चौकशीकरीता पत्र पाठविले होते. हा घटना क्रमही मे महिण्यातच समोर आला. असे अनेक प्रकरणे खासदार धानोरकर यांचेशी संबंधीत याच महिण्यात पुढे आली.

दरम्यान, वडील नारायणराव धानोरकर यांची प्रकृती बिघडली. २८ मेरोजी त्यांचे निधन झाले. त्यानंतर वरोरा येथे खासदार बाळू धानोरकर यांचीही प्रकृती बिघडली. त्यांनाही नागपूरला हलविण्यात आले. नागपुरात उपचार सुरू असताना धानोरकर यांच्यावर किडनी स्टोनची शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटाचा आजार वाढत होता. अशातच वडील नारायणराव यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्याचदिवशी बाळू धानोरकर यांनी रूग्णालयातच त्यांचे शेवटचे अंत्यदर्शन घेतले. भद्रावती शहरात वडिलांवर अंत्यसंस्कार पडले. परंतु ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच दिवशी त्यांचा पोटाच आजार पुन्हा वाढला. त्यामुळे त्यांना दिल्लीतील मेदांता हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. व्हेंटीलेटरवर असताना त्यांची प्रकृती उपचारास प्रतिसाद देत नव्हती. अखेर मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. अवघे ४८ वय, समाजाची सेवा करण्याचा उमेदीचा काळ असतानाच त्यांनी वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन जगाचा अखेरचा निरोप घेतला. ते काळाच्या पडद्याआड झाल्याने कार्यकर्ते, चाहते व कुटुंबीय आता पोरके झाले आहेत.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news