

पुढारी ऑनलाईन डेस्क: चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज (दि. ३१) दुपारी साडेबाराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वणी – वरोरा बायपास मार्गावरील मोक्षधाममध्ये त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मोठा मुलगा मानस धानोरकर यांने पार्थिवाला मुखाग्नी दिली. पोलिस तुकडीने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून तसेच बिगुल वाजवून त्यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली.
आज बुधवारी धानोरकर यांच्या निवासस्थानावरून वरोरा शहरातील मुख्य मार्गाने अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यदर्शनासाठी वरोरा शहरासह चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकत्यानी गर्दी केली होती. अंत्यदर्शनासाठी राज्यातील मोठे नेते दाखल झाले होते. बाळू धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे सांत्वन यावेळी करण्यात आले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक, बाळासाहेब थोरात, खासदार विनायक राऊत, आमदार अनिल देशमुख, आमदार सुनील केदार, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार यशोमती ठाकूर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, माजी खासदार नरेश पुगलीया, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यासह विदर्भातील नेत्याची उपस्थिती होती. या सर्वानी खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भद्रावती,वरोरासह चंद्रपूर, यवतमाळ, आर्णी तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.
चंद्रपूर लोसभा क्षेत्राचे काँग्रसेचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर पोटाच्या व्याधीने ग्रस्त होते. तीन ते चार दिवसांपासून त्यांना त्रास सुरू झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे सर्वप्रथम नागपुरात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. किडनी स्टोनची शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यांनतरही त्रास वाढत असल्याने त्यांना 28 मे ला दिल्लीतील मेदांता हॉस्पीटल मध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते. व्हेंटीलेटरवर असताना मंगळवारी (दि. ३०) पहाटेला ३ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली
मंगळवारी दुपारी नागपूर मार्गे वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचा पार्थिव आणण्यात आला होता. दुपारी चार वाजता पार्थिव अंत्यदर्शनाकरीता ठेवण्यात आले. कार्यकर्ते, नागरिकांनी दर्शनाकरीता प्रचंड गर्दी केली होती.
हेही वाचा