चंद्रपूर : वरोऱ्यात खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार | पुढारी

चंद्रपूर : वरोऱ्यात खासदार बाळू धानोरकर यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा चंद्रपूरचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या पार्थीवावर आज (बुधवार) दुपारी 11.30 वाजण्याच्या सुमारास वरोऱ्यातील मोक्षधामवर अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. राजकारणातील दिग्‍गज अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी वरोरा येथे येऊन धानोरकर कुटूंबियांची भेट घेणार आहेत.

खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांची प्रकृती बिघडल्याने सर्वप्रथम त्यांना नागपुरातील रूग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यावर किडनीस्टोनची शस्त्रक्रियाही पार पडली. प्रकृती स्थिर होत असताना अचानक त्‍यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्ली येथे हलविण्यात आले. मेंदांता हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना काल (मंगळवार) पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. काल मंगळवार दुपारी एअर एम्बुलन्सने त्यांचे पार्थिव नागपुरात आणण्यात आले. त्यांनतर त्यांचे गाव वरोरा निवासस्थानी दुपारी पार्थिव आणून अंत्यदर्शनाकरीता ठेवण्यात आले. दुपारपासून कार्यकर्ते, त्याचे चाहते, नागरिकांनी त्यांचे शेवटचे दर्शन घेण्याकरीता एकच गर्दी केली होती.

आज (मंगळवार) सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास वणी – वरोरा बायपास मार्ग येथील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. अंत्यसंस्काराची संपूर्ण तयार झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अंत्यसंस्काराला राज्यातील विविध पक्षांचे राजकीय नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कालपासूनच वरोऱ्यात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सायंकाळी 6.10 वाजता वरोरा येथे पोहचणार आहे. धानोरकर कुटूंबियांची ते भेट घेऊन सांत्वन करतील. बाळू धानोरकर यांचे राजकीय गुरू खासदार विनायक राऊत, दुष्यंत चतुर्वेदी अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : 

Back to top button