दिलीप शिंदे
दिलीप शिंदे हे दैनिक पुढारी समूहात ठाणे येथे मुख्य वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. राजकीय, शोध पत्रकारिता, विकासात्मक आणि गुन्हे पत्रकारिता गेल्या २५ वर्षांपासून ते करीत आहेत. त्यांना राज्य शासनाच्या शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने २००६ आणि २०१४ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने २०१० आणि २०१४ मध्ये सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन राज्यपालांच्या हस्ते गौरविण्यात आले. शोधपत्रकारितेबद्दल विधीमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाने २०१६ मध्ये राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित केले.
मंत्रालय, विधीमंडळ अधिवेशनांचे वृत्तांकन, राज्यस्तरीय विषयांवर संशोधनात्मक वृत्त मालिका, राजकीय विश्लेषण, वार्तापत्रांचे लेखन, गुन्हेगारी, विविध प्रशासकीय कारभारावरील वृत्तसंकलनात हातखंडा आहे.
भारतात गाजलेल्या लाल गहू भ्रष्टाचाराचा भांडाफोड, एमएमआरडीएच्या निर्मल वस्ती शौचालयाच्या १२८ कोटींचा भ्रष्टाचाराचा, जलवाहिनी घोटाळ्याप्रकरणी १६ नगरसेवकांवर गुन्हे दाखल, राज्यातील नळपाणी पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणले. बंद पडलेल्या योजनांवर प्रकाश टाकणारी 'जीवन मृत्युमुखी' या शिर्षकाखालील मालिका गाजली. शेतकऱ्यांची सावकारी कर्जमाफी कशी फसवी आहे, ती कशी कागदावर राहणार, याबाबत अभ्यासपूर्ण बातम्या प्रसिद्ध केल्याने सावकारी कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा सरकारला करावी लागली. कल्याण-डोंविबली महापालिकेतील ६५४ कोटी रुपयांच्या बीएसयुपी योजनेच्या घोटाळ्यांची मालिका लिहिली आणि यानंतर आयएएस अधिकाऱ्यांसह ४० जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे गुन्हे आणि चौकशी झाली.