

ठाणे : दिलीप शिंदे
शिवसेना आणि भाजप युतीचा उधळणारा वारू हा प्रत्येक निवडणुकीत ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर येऊन थबकतो. मोठ्या भावाचा दावा करीत शिवसेनेकडून मित्रपक्षांना सन्मानजनक जागा सोडण्यास नकार दिल्याने भाजप अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्याच्या रणनीतीवर युद्धपातळीवर काम करीत आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात शिवसेना, भाजप-राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढती पाहायला मिळू शकतात.
महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांत युती करण्याचे निर्णय भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे प्रमुख मिळून घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वारंवार सांगत असले तरी भाजपचे नेते, आमदार आणि मंत्र्यांकडून स्वबळाचा नारा दिला जात आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांपैकी नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिकेत भाजपचे कमळ फुलत असून ठाणे महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि भिवंडीत महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता होती. याठिकाणीदेखील महायुती नको, असा सूर उमटू लागला आहे.
ठाणे महापालिकेत १३१ जागा असून त्यापैकी ८० नगरसेवक शिवसेनेचे आहेत. शरद पवार गटाचे कळवा मुंब्यातील ११ नगरसेवक फोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्का दिला आहे. वागळे इस्टेट परिसरातील पाच सक्षम नगरसेवकांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकल्याने शिवसेना अधिक मजबूत झाल्याचे दिसते. त्यामुळे ठाणे महापालिकेतील आपली सत्ता अबाधित राहणार याची खात्री शिवसे-नेला आहे. त्यामुळेच ठाण्यात भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत भागीदारी का द्यायची, अशा मानसिकेत सेना नेते आहेत.
दुसरीकडे भाजपकडे २३ नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच ते सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात भाजप आणि राष्ट्रवादीला फारशा जागा मिळणार नाहीत. तिन्ही पक्षांच्या विद्यमान नगरसेवकांची संख्या १०९ आहे. उर्वरित २२ जागांचे वाटप होणार असून त्यातील बहुतेक जागा या मुंब्रा भागातील आहेत. महायुतीच्या जागावाटपात सन्मानजनक जागा न देता मुंब्यातील जागा आपल्या गळ्यात बांधल्या जातील, मग युतीमध्ये लढून काय उपयोग, पक्ष कधी वाढणार, कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळणार, असे प्रश्न भाजपमध्ये उपस्थित झाले आहेत. यातूनच मंत्री गणेश नाईक आणि आमदार संजय केळकर हे दोघेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातत्याने लक्ष्य करीत स्वबळावर महापौर बसविण्याची तयारी करू लागले आहेत.
महायुतीमधील संघर्ष टोकाला
नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर पालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. वनमंत्री गणेश नाईक आणि आमदार नरेंद्र मेहता यांचे वर्चस्व असल्याने तिथे शिवसेनेला फार महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे खासदार नरेश म्हस्के हे नवी मुंबईत, तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक मीरा-भाईंदरमध्ये तळ ठोकून असतात. मंत्री गणेश नाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लोकांचे प्रश्न सोडविण्यास लायक नसल्याचे टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे संतप्त झालेले खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत नाईक यांच्या नालायकपणाचे व्हिडीओ संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमागृहात प्रदर्शित करण्याचा इशारा देऊन ठेवला. हे आव्हान नाईक यांनीही स्वीकारल्याने महायुतीमधील संघर्ष टोकाला जाऊ लागला आहे.
भाजप आणि शिवसेनच्या भांडणात राष्ट्रवादी काँग्रेस भरडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ घेण्यास शिवसेनेला स्वारस्य नाही. राष्ट्रवादीच्या कुठल्याच पदाधिकाऱ्याला शिवसेना कार्यक्रमाला बोलावत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी जुळवून घेत आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती आखली असून काही प्रभागही निश्चित केले आहेत. शिवसेनेचीही स्वबळाची अगोदरच तयारी झाली असून युती तोडण्यास भाजप कधी पुढाकार घेतो, या संधीची शिवसेनेला प्रतीक्षा आहे.