

भिगवण : पुढारी वृत्तसेवा
नराधम पुतण्यानेच चुलतीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली. याची वाच्यता केल्यास पीडित महिलेसह घरातील कुटूंबाला कापून टाकण्याची धमकी दिल्याने घाबरलेल्या महिलेने आठ दिवसानंतर पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. नात्याला काळीमा फासणारी ही घटना भिगवण जवळ घडली आहे. यावरून पोलिसांनी या पुतण्याविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी आदी कलामांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ४ मार्च ते ८ मार्च दरम्यान घडली आहे. हा नराधम पीडितेचा पुतण्या असुन, त्याने पीडितेच्या घरात अनधिकृतपणे घुसून बळजबरीने शाररिक संबंध केला. त्यानंतर वेळोवेळी पीडितेला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत होता. आरोपी हा नातेवाईक असल्याने व त्याने ही घटना कोणास सांगितली तर तिला आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने ही महिला दहशतीतच वावरत होती.
घाबरलेल्या पीडितेने वारंवार होणाऱ्या झाचाला त्रासून अखेर आठ दिवसांनी भिगवण पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार या नराधमाविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रुपेश कदम तपास करीत आहेत.