

पुणे; पुढारी वृत्तसेवा : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त राज्य सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार आणि वाघनखे एकत्रितरीत्या भारतात आणावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जगदंबा तलवार आणण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर या दोन्ही ऐतिहासिक गोष्टी एकत्रितच भारतात परत आणता येतील, असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. वाघनखांविषयी पत्रव्यवहाराची औपचारिकता इंग्लंडकडून पूर्ण करण्यात आली असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली.
पुणे दौर्यावर असताना कै. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने उभारलेल्या आंबेगाव (बु.) येथील 'शिवसृष्टी'ला मुनगंटीवार यांनी भेट दिली आणि त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षानिमित्त वर्षभरात 100 हून अधिक कार्यक्रम होतील. यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 'जाणता राजा' महानाट्याचे प्रयोग, चित्रपट महोत्सव, शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन असे उपक्रम घेण्यात येतील.
याचाच एक भाग म्हणून येत्या 9 ऑगस्टपासून मंत्रालयात रोज सकाळी 9.45 वाजता सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित दिनविशेष आणि त्यांचे विचार प्रसारित करण्यात येणार आहेत. याशिवाय शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित 12 टपाल तिकिटेही प्रकाशित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. या वर्षभरात केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील 'होन' हे चलनी नाणे सोने, चांदी, तांब्याच्या धातूत सादर करीत स्मरणिका म्हणून प्रकाशित करण्यात येणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
मुंबई येथे 30 एकर जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित संग्रहालय उभारण्यात येईल. शिवरायांच्या जीवनाशी निगडित 88 हजार वस्तू राज्यात विविध ठिकाणी आहेत, त्या एकाच ठिकाणी आणण्याचाही प्रयत्न संग्रहालयाच्या निमित्ताने होणार आहे. सुयोग्य जागेचा शोध घेऊन ती सुनिश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
– सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री.
हेही वाचा