

मंचर : पुढारी वृत्तसेवा : 'तुमचे पीक विम्याचे आणि मोदीचे पैसे आले आहेत का? तुमची शेती कोठे आहे. शेतीचे फोटो टेरेसवरून घेता येतील का ?' असे म्हणून दिवसाढवळ्या घरात घुसून चौघांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी घरातील ज्येष्ठ नागरिकाने प्रतिकार केल्याने चोरटे पसार झाले. आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव सालोबामळा येथे शनिवारी (दि. 19) दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष बाब म्हणजे चोरी करण्यासाठी आलेले चोरटे हे थेट चारचाकीतून आले होते. त्यामुळे या घटनेची चर्चा परिसरात रंगली आहे.
या प्रकरणी संतोष खंडू झोडगे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष झोडगे हे शेतात गेले असता त्यांचे वडील खंडू झोडगे हे घरीच होते. दुपारीदीडच्या सुमारास त्यांच्या घरासमोर एक चारचाकी आली. त्यामध्ये चालकासह इतर तीन व्यक्ती होते. तिघेही घरासमोर आल्यावर त्यांनी खंडू यांना 'तुमचे पीक विम्याचे आणि मोदीचे पैसे आले आहेत का ? तुमची शेती कोठे आहे. शेतीचे फोटो टेरेसवरून घेता येतील का?' असे म्हणून एक व्यक्ती जिन्याच्या बाजूने टेरेसवर जाऊ लागला. खंडू हे त्याच्या मागून गेले असता इतर दोघांनी घरात प्रवेश करण्यासाठी सेफ्टी दरवाजा उघडला, तो आवाज ऐकून खंडू पुन्हा घरात आले, या वेळी एक व्यक्ती बेडरूममध्ये गेला होता व कपाटला लाथ मारून ते उघडण्याचा प्रयत्न करत होता.
तर दुसर्याने खंडू यांना दरवाजाजवळ धरून ठेवले. चारचाकीमधील व्यक्तीही घरात आला, त्याने खंडू यांचे तोंड दाबून धरले. तर तिसर्याने खंडू यांचा हात सेफ्टीडोअरमध्ये अडकवून धरला. यामध्ये त्यांच्या हाताला जखम झाली. त्यावर खंडू यांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांनी खंडू यांना हॉलमध्ये ढकलून देत घराचा दरवाजा बाहेरून बंद करून पळून गेले. जखमी खंडू यांना घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी घोडेगाव पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक महेश पवार हे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा :