पुणे मनपाकडून झाडांवर रात्रीत ‘सर्जिकल स्ट्राइक’

येरवडा : पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकातील सुमारे 35 वृक्ष तोडण्यात आले. पोलिस बंदोबस्तात रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. बाजूला असलेल्या मातृछाया सोसायटीतील नागरिकांनी विरोध करूनदेखील रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचे कारण देत ही झाडे तोडण्यात आली. शास्त्रीनगर चौकात रामवाडीवरून येरवड्याकडे मातृछाया सोसायटीजवळ अनेक दाट झाडे होती. या झाडांमुळे वाहतुकीस अडथळा येत होता. पथ विभागामार्फत हे वृक्ष तोडण्याबाबतचा रितसर प्रस्ताव नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे वृक्ष अधिकारी तथा सहायक महापालिका आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आला होता. वृक्ष अधिकारी सोमनाथ बनकर यांनी या ठिकाणाचे 44 वृक्ष काढण्याबाबत परवानगी दिली होती. त्यापैकी 35 झाडे पूर्ण काढण्यास परवानगी दिली होती, तर 5 झाडांचे पुनर्रोपण करण्यास मान्यता दिली होती. नगर रस्त्यावर देशी 935 झाडे लावण्याच्या बदल्यात 35 झाडे पूर्ण करण्यास परवानगी दिली होती.
हे वृक्ष तोडण्यास परवानगी असतानादेखील रात्रीच्या वेळी वृक्षतोड करण्यास बंदी असताना हे 34 वृक्ष रात्रीच्या वेळी तोडण्यात आले. या वेळी स्थानिक मातृछाया सोसायटीतील नागरिकांनी वृक्ष तोडण्यास विरोध केला असता पोलिसांच्या बळावर रात्रीतच झाडे तोडण्यात आली. झाडे तोडण्याअगोदर झाडांवर कोणत्याही प्रकारची नोटीस लावण्यात आली नव्हती. रस्ता रुंदीकरणास अडथळा होत असल्याच्या कारणावरून रात्रीच्या वेळी पूर्वकल्पना न देता झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत स्थानिक रहिवासी जयंत मोहिते म्हणाले, ‘रस्ता रुंदीकरणात जागा गेलेल्या नागरिकांना अद्याप मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे ही झाडे ही खासगी मालकांच्या जागेवर होती. ही झाडे तोडण्याअगोदर झाडांवर कोणत्याही स्वरूपाची नोटीस लावलेली नव्हती. सोसायटीमधील नागरिकांनी वृक्ष तोडण्यास विरोध केला असता पोलिस बळावर वृक्ष तोडण्यात आले.’
बनकर म्हणाले, ‘रस्ता रुंदीकरणास तसेच वाहतुकीला अडथळा होत असल्याने हे वृक्ष काढण्याबाबत पथ विभागाने प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार नियम व अटी घालून हे वृक्ष तोडण्यास परवानगी देण्यात आली होती. तोडताना नियमांचे उल्लंघन झाले असल्यास कारवाई केली जाईल.’
पथ विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल मुळे म्हणाले, ‘या झाडांमुळे वाहतूक कोंडी होत होती. त्याचबरोबर हा अपघातग्रस्त स्पॉट झाला होता. त्यामुळे परवानगी घेऊन वृक्ष तोडण्यात आले आहेत. परवानगी घेतलेल्या झाडांपेक्षा कमी झाडे तोडली आहेत. वाहतुकीला अडथळा होतो यामुळेच रात्रीच्या वेळी वृक्ष तोडण्यात आले.’